Wednesday, April 30, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

नाशिक पदवीधरमध्ये आणखी एक ट्विस्ट

नाशिक पदवीधरमध्ये आणखी एक ट्विस्ट

ठाकरे गटाचा अपक्ष शुभांगी पाटील यांना पाठिंबा

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे फॉर्म भरताना मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. पदवीधरसाठी काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण, ऐनवेळी सुधीर तांबेंऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केला. भाजपचा सत्यजीत तांबे यांना पाठिंबा मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता आणखी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज न भरता सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. नाशिक पदवीधरसाठी उमेदवारी मिळावी म्हणून शुंभागी पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता.

त्यामुळे पदवीधर मतदार संघाची उमेदवारी त्यांनाच मिळणार हे जवळपास निश्चित झाले असताना निर्णय न झाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. शुभांगी पाटील यांनी भाजपचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, भाजपचा पाठिंबा सत्यजीत तांबे यांना मिळणार हे दिसताच, शुभांगी पाटील यांनी आज मुंबईत मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेना ठाकरे गटाने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

शुभांगी पाटील यांनी मातोश्रीशी संपर्क साधला आणि आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासोबत त्यांची बैठकही झाली. या बैठकीतच शुभांगी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाकडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस देखील पाठिंबा देण्याची शक्यता असून त्या महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार असण्याची शक्यता आहे.

त्या याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होत्या. मात्र, काही काळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटना स्थापन करून या संघटने माध्यमातून काम करण्यास सुरुवात केली. २१ सप्टेंबर २०२२ रोजी शुभांगी पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला होता.

शुभांगी पाटील यांचं बीए.डीएड, एम. ए बी. एड. एल. एल बी शिक्षण झालं असून त्या भास्कराचार्य संशोधन संस्था, धुळेच्या यशवंत विनय मंदिर येथे शिक्षिका आहेत. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापक असून महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या प्रमुख सल्लागार आहेत. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांमध्ये त्या पदाधिकारी आहेत.

Comments
Add Comment