
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा दर महिन्याच्या सात तारखेला होणारा पगार अलिकडे चांगलाच रखडत चालला आहे. या महिन्याची बारा तारीख उलटूनही पगार न झाल्याने कर्मचारी संतप्त झाले असताना अखेर राज्य सरकारने शुक्रवारी दुपारी तीनशे कोटीचा निधी वळता केला. मात्र हा निधी अपुरा आहे. यातून कामगारांचे नुकसानच असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटी महामंडळाचा तोटा दिवसेंदिवस वाढतच असून महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यातच महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी २०२१च्या दिवाळीपासून संप सुरू केला. तो प्रचंड लांबल्याने आणि त्याआधी कोरोनासंकट त्यामुळे महामंडळ आणखीनच अडचणीत आले आहे. संपकाळात न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीसमोर वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ ते ११तारखेदरम्यान वेतन देण्याचे सरकारच्यावतीने न्यायालयात मान्य केले होते. पण या महिन्याची १२ तारीख उलटून गेली तरी सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता.
त्यातच सरकारने आज फक्त ३००कोटी रुपयांचा निधी महामंडळाला दिला असून तो अपुरा असल्याने त्यातून फक्त वेतन होणार आहे. पीएफ, ग्रॅज्युटी व बँक कर्ज ही देणी प्रलंबित राहणार असून त्यामुळे सरकारने पुन्हा वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार केला आहे, असा आरोप बरगे यांनी केला.