आमदार दरेकरांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबई : मुंबईतील सिमेंट-कॉंक्रिटच्या रस्ते कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप करणा-या आदित्य ठाकरे यांना भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार होती. मुंबईला लुटून खरे दरोडे कुणी टाकले हे मुंबईकरांना नीट माहित आहे, असा घणाघात दरेकर यांनी केला. तसेच शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या विकासाची गती होतेय त्याने उद्धव ठाकरे भयभीत आणि आदित्य ठाकरे भांबावलेल्या अवस्थेत आहेत, असेही दरेकर म्हणाले.
दरेकर म्हणाले की, कंत्राट, कंत्राटदारांशी संबंध आणि टक्केवारीचा उत्तम अभ्यास आदित्य ठाकरे यांचा दिसला. कारण इतकी वर्ष महापालिकेत कंत्राटदार कोण होते? त्यांचे संबंध कुणाशी होते? टक्केवारीचे गणित काय होते? हे गणित त्यांनी आज नीट मांडले. खरे म्हणजे कामाचा दर्जा राखला जात नव्हता. परंतु यांना मुंबईकरांच्या कामाच्या दर्जा संबंधी काही देणेघेणे नव्हते तर टक्केवारीचे कॅलक्यूलेशन महत्वाचे होते, असा टोलाही दरेकरांनी यावेळी लगावला.
ते पुढे म्हणाले की, एका बाजूला सांगताहेत नॅशनल कंपन्या चांगल्या कंपन्या आहेत. मग आपल्या पोटात का दुखते. उत्तम कंपन्या आणून वेळेत काम होणार असेल तर आपण क्षमतेवर शंका कशाला घेता. सहा वर्षाचे काम तीन वर्षाचे कंत्राट देऊन पुढे जाणार असेल तर यात गैरव्यवहार, भ्रष्टाचार कुठे आला. पूर्णपणे मुंबईचा कायापालट होतोय, ज्या गतीने शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या विकासाची गती होतेय त्याने उद्धव ठाकरे भयभीत आणि आदित्य ठाकरे भांबावलेल्या अवस्थेत आहेत. खोके सरकार, खोके सरकार या पलीकडे त्यांची रिळ पुढे जायला तयार नाही. आज प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर, अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एवढी वर्ष आयुक्त चहलच होते ना? मातोश्रीवर फेऱ्या मारत होते तेव्हा त्यांचे उत्तम आयुक्त म्हणून वर्णन केले. सरकार बदलल्यावर त्यांच्या अधिकारांवर प्रश्न उभे करता. यावरून मुंबईवरील पुतना मावशीचे प्रेम आणि राजकारण मुंबईकरांना दिसून येतेय, असा घणाघातही दरेकरांनी यावेळी केला.
सहा महिने झाले, पाच हजार कोटीच्या टेंडरनी एवढे अत्यवस्थ का होताय, असा सवाल करत दरेकर पुढे म्हणाले की, २५ वर्षाच्या टेंडरची रक्कम काढा, कंत्राटदारांची यादी जाहीर करा. मग आदित्यजी मुंबईला लूटमार नाही तर दरोडेखोर कोण, दरोडे कुणी टाकले, मुंबईकरांना नीट माहित आहे. त्यामुळे पोकळ आव आणण्याचा प्रयत्न करू नका. मुंबईकर सुज्ञ आहे. मुंबईकर सब कुछ जानता है.