विकास कामासंदर्भात बैठकीत चर्चा
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण आता यामध्ये ट्विस्ट येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात काल बंद दाराआड झालेल्या बैठकीमुळे शिंदे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात काल अडीच तास बैठक झाली. त्यामुळे या बंद दाराआड भेटीत नेमकं काय दडलंय? प्रकाश आंबेडकरांची नेमकी भूमिका काय आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या बैठकीमध्ये राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत असली तरी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आणि शिंदे गटाचे प्रवक्ते यांनी ही बैठक विकास कामासंदर्भात झाल्याची माहिती दिली आहे.
एका खासगी मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळेंनी सांगितले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेली ही बैठकी इंदू मिल येथे बांधण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात होती. यासाठी प्रकाश आंबेडकर हे आधीपासून प्रयत्नशील आहेत. मुळात या स्मारकाची संकल्पना आणि जागतिक दर्जाचं संशोधन केंद्र व्हावं. तसेच त्याठिकाणी संस्था उभी राहावी अशी भूमिका त्यांनी सातत्याने घेतली. त्या आधारावर स्मारकाचं काम उभं राहिलं आहे. स्मारकासंदर्भात विविध समित्यांचे अहवाल येत आहेत. त्यासंदर्भातील चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांची ही भेट झाली होती. तसेच यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि भाजपसोबत असलेल्या कुठल्याही पक्षासोबत युती करणार नाही, असे जाहीर केले होते.”
तसेच शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले की, “प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाल्यानंतर त्यांच्या युतीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला आहे. शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणाकरिता आणि राज्याच्या विकासाकरिता सर्वांनी एकत्र येऊन पाऊल उचलणं गरजेचं आहे. विरोधासाठी विरोध न करता चांगल्या कामासाठी पाठिंबा देणं गरजेचं आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टीकरिता ही बैठक होऊन त्याचे फलित मिळू शकते. तसेच काही निर्णय पेंडिंग आहेत, त्यासंदर्भातील निर्णय सहमतीने घेणे गरजेचे आहे.”