२ लाख २० हजार घरातील वीजपुरवठा खंडित, अनेक भाग पाण्याखाली, १७ ठार, आणखी ४ वादळे येणार
कॅलिफोर्निया : अमेरिकेतील कॅलिफोर्नियात गेल्या दोन आठवड्यांपासून धोकादायक वादळी पावसाने कहर घातला आहे. २६ डिसेंबरपासून ते आत्तापर्यंत ६ वादळ या ठिकाणी आले असून त्यात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या ९० टक्के लोकसंख्येला म्हणजे ३ कोटी ४० लाख लोकांना या महापूराचा धोका आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बुधवारी मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि अचानक पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. तसेच येत्या १० दिवसांत आणखी ४ वादळे येण्याची शक्यता आहे. याचा उत्तर कॅलिफोर्निया क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कॅलिफोर्नियातील परिस्थिती पाहता राज्यात आणीबाणी लागू केली आहे. त्यामुळे नागरिकांना आपत्तीतून लवकरात लवकर दिलासा मिळणार आहे.
सातत्याने सुरू असलेल्या वादळी-वाऱ्यांसह २ लाख २० हजारांहून अधिक घरे आणि दुकानांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. ३५ हजाराहून अधिक लोकांना शासनाच्या वतीने घरे खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कॅलिफोर्नियातील रस्त्यांवर नद्यांसारखे पाणी वाहत आहे. लॉस एंजेलिस शहरात रस्ता खचल्याने दोन वाहने खड्ड्यात पडली. हीच स्थिती इतर अनेक क्षेत्रांची आहे. कॅलिफोर्नियाच्या महामार्गावर अचानक भूस्खलन झाल्यामुळे लोकांना वाहने चालवणे कठीण झाले आहे. यासाठी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पासो रॉबल्स शहरातील शाळेत जाताना ५ वर्षांचा मुलगा अचानक पुरात वाहून गेला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो अद्याप बेपत्ता आहे.