ठाण्याची विरारमध्ये पुनरावृत्ती
विरार : मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकात एसी लोकलचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना थेट कळवा कारशेडमध्ये जावे लागले होते. अशाच प्रकारे सोमवारी रात्री पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकातही दरवाजे न उघडल्याने प्रवाशांनी विरार स्थानकात प्रचंड गोंधळ घातला.
सोमवारी रात्री साडेअकरा वाजता नालासोपारा स्थानकात एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाहीत. त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला. सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास मुंबईहून विरारकडे जाणारी एसी ट्रेन नालासोपारा रेल्वेस्थानकात थांबली. मात्र, त्यावेळी ट्रेनचे दरवाजेच उघडले नाहीत. त्यानंतर एसी लोकल विरार स्थानकात जाऊन थांबली. तेव्हा संतप्त प्रवाशांनी विरार स्थानकात चांगलाच गोंधळ घातला.
नालासोपारा स्थानकात दरवाजे न उघडल्याने प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. भयभीत झालेल्या प्रवाशांनी याचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर ही एसी लोकल विरार स्थानकात थांबली तेव्हा प्रवाशांच्या संतापाचा भडका उडाला. संतप्त प्रवाशांनी एसी लोकलच्या मोटरमनला ट्रेनच्या केबिनमध्ये कोंडून ठेवले. अखेर रेल्वे पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मोटरमनची सुटका करण्यात आली.
नालासोपारा स्थानकात एसी ट्रेनचे दरवाजे का उघडले नाहीत, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. हा प्रकार मोटरमनच्या चुकीमुळे का तांत्रिक बिघाडामुळे घडला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याबाबतची तक्रार काही प्रवाशांनी विरार स्टेशन मास्तरकडे केली आहे.
मात्र, विरार स्टेशन मास्तरांनी या घटनेचा इन्कार केला असून गार्डने दरवाजे उघडल्याचे सांगितले आहे. या गोंधळाची रेल्वेनं दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिल्याचे समजते.