दाऊदच्या व्यवहारांना संरक्षण, याकूबची कबर सजवली, स्वार्थासाठी मशाल पेटवली
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने कॉल करून १९९३ प्रमाणे बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी नबी खान उर्फ के. जी. एन. लाला याला अटक केली आहे. यावरून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी थेट माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच मुंबईचे तथाकथित रक्षणकर्ते आता तरी निषेध करणार का? असा प्रश्नही शेलार यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नाव न घेता विचारला आहे.
“१९९३ मध्ये जसे बॉम्बस्फोट झाले, त्याप्रमाणे दोन महिन्यांनंतर मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होईल आणि त्यानंतर जातीय दंगली होतील, असा कॉल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नबी खान उर्फ के. जी. एन. लाला याला अटक केली आहे. तसेच १९९३च्या बॉम्बस्फोटातील काही आरोपी लालाच्या परिचयाचे आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या अशा घातक समाजकंटकांना बळ कसे मिळते?” असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे.
लव्ह जिहादशी संबंधित घटनांमुळे सामाजिक बांधिलकी आणि ऐक्याला तडा जात आहे. त्यामुळे लव्ह जिहाद विरोधात राज्य सरकारने कायदा बनवावा आणि समस्त नागरिकांनी या कायद्याला समर्थन द्यावे.@BJP4Mumbai @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde pic.twitter.com/e4MEAk2GUV
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 9, 2023
आशिष शेलार यांनी ट्विट करत सवाल केला आहे की, अशा घातक गुन्हेगार, समाजकंटकांना बळ कसे मिळते? राजकीय स्वार्थासाठी लांगुलचालनाच्या राजकारणाचे घातक पट कोण रचतेय? आम्ही ‘जागर मुंबई’ मधून हेच मुंबईकरांसमोर उघड करतोय. आम्ही स्वार्थासाठी ‘मशाल’ पेटवलेली नाही आम्ही मुंबईकरांसाठी लढतोय.
“नवाब मलिक-दाऊदच्या व्यवहारांना संरक्षण दिले. याकूबची कबर सजवली. मुंबईचे तथाकथित रक्षणकर्ते याचा तरी निषेध करणार का? राजकीय स्वार्थासाठी लांगुलचालनाच्या राजकारणाचे घातक पट कोण रचतंय? अशी टीका त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर केली आहे. तसेच आम्ही स्वार्थासाठी मशाल पेटवली नसून आम्ही मुंबईकरांसाठी लढतोय, असेही ते म्हणाले.