हैदराबाद : महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू अभिजित कटके रविवारी हिंदकेसरी किताबाचा मानकरी ठरला. त्याने ५१ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या फायनलमध्ये हरियाणाच्या सोमवीरला धूळ चारली. पुण्याच्या अभिजितने ५-० अशा फरकाने फायनल जिंकून किताबावर नाव कोरले. हैदराबाद येथे भारतीय शैली कुस्ती महासंघाने आयोजित या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेची कामगिरी लक्षवेधी ठरली.
अभिजित पुण्यातील शिवरामदादा तालीम येथे सराव करतो. यापूर्वी अभिजितने महाराष्ट्र केसरी, भारत केसरी किताब जिंकला आहे. दोन्ही किताब मिळवणाऱ्या दीनानाथ सिंह, दादुमामा चौगुले, हरिश्चंद्र बिराजदार, विनोद चौगुले, अमोल बुचडे यांच्या पंक्तीत तो विराजमान झाला आहे. मान्यवरांच्या हस्ते अभिजित कटकेला चांदीची गदा देऊन गौरवण्यात आले.