
मुंबई : दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स दुसरीकडे स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महालक्ष्मी रेसकोर्सचा भाडेकरार १० वर्षांपूर्वी संपुष्टात आला असून आता या भूखंडावर थीमपार्क उभारण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी महालक्ष्मी रेसकोर्स मुंबईतच दुसरीकडे हलविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
महालक्ष्मी ऐवजी रेसकोर्स आता मुलुंडच्या डम्पिंग ग्राऊंडवर नेण्याचा प्रस्ताव आहे. मुलुंडचा डम्पिंग ग्राऊंडचा परिसर साधारणपणे २४ हेक्टर इतका आहे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचा करार काही वर्षांपूर्वीच संपला आहे. त्यामुळे या जागेचा ताबा पुन्हा महानगरपालिकेकडे घेण्यासाठी राज्य सरकारला पत्र लिहणार आहे. तर, रॉयल वेस्ट इंडिया टर्फला त्या बदल्यात दुसरी जागा देण्यात येणार आहे.
दरम्यान, मुलुंडचे डंम्पिंग ग्राउंड आणि त्याच्या शेजारील खासगी मालकीची जागा रेसकोर्स आणि इतर सुविधांना सामावून घेण्यासाठी पुरेशी आहे. परंतु, खासगी जमीन संपादित करण्यासाठी महापालिकेला मोठी किंमत मोजावी लागेल कारण ती जागा सध्याच्या बाजारभावानुसार विकत घ्यावी लागेल, असे राज्य सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. खासगी जमीन खरेदी करून ती रेसकोर्ससाठी सुपूर्द करणे शक्य होणार नाही. रेसकोर्स चालवणे हा सार्वजनिक उद्देश नसल्यामुळे, खासगी जमीन खरेदी करण्यासाठी सार्वजनिक पैसा खर्च करण्यास विरोध होऊ शकतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
तर मुलुंड डम्पिंग ग्राऊंडचा पर्याय अजूनही विचारधीन असून त्याबाबत चर्चा सुरू असल्याचे महापालिकेचे प्रमुख इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले.