Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमीशिवसेना संपविण्याची संजयने घेतली सुपारी

शिवसेना संपविण्याची संजयने घेतली सुपारी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ‘प्रहार’

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली असल्याचा प्रहार केंद्रीय लघू, सूक्ष्म, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. दरम्यान संजय राऊतच्या काही गोष्टी मी उद्धव ठाकरे यांना सांगितल्या, तर ते त्यांना चपलेने मारतील, असेही राणे यावेळी म्हणाले.

भाजप आमदार राम कदम यांच्याकडून शनिवारी काशी यात्रेकरूंसाठी खास काशी यात्रेची ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सोडण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बोलताना राणे यांनी राऊतांवर प्रहार केला.

संजय राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे यावेळी राणे म्हणाले. “एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. मी खासदार झालो तेव्हा संसदेत असताना राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचा. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबद्दल जे काही सांगायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. ते ऐकल्यावर ते संजय राऊत याला चपलेने मारतील, असा गौप्यस्फोटही यावेळी राणे यांनी केला.

राणे म्हणाले, मातोश्रीबद्दल संजय राऊतांची भूमिका ही योग्य नाही, त्यांचा उद्देश चांगला नाही. आता शिवसेनेमध्ये कोणीही उरलेले नाही. याचा आनंद संजय राऊत यांना होत आहे. त्यानेच शिवसेना संपवली. त्याने सामाजिक, आर्थिक, धार्मिक असे कोणतेच काम केलेले नाही. संजय राऊत मातोश्रीला सुरुंग लावणारा विषारी प्राणी आहे. तो ज्याच्या अंगावर हात टाकेल तो खांदा गळालाच समजा, असेही राणे यांनी सांगितले.

संजय राऊत राजकारणातला जोकर

संजय राऊत यांना आता काहीही काम नाही. सकाळी उठल्यावर यांना बोलायची सवय लागली आहे. ते काहीही बोलत आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासारखे विषयही नाहीत. त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. दरम्यान संजय राऊत राजकारणातला जोकर आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी यावेळी केली.

चॅलेंज स्वीकारले!

संजय राऊतांच्या आव्हानाला चोख प्रत्युत्तर देताना नारायण राणे यांनी ‘तू म्हणशील तिथे येतो. आताच संरक्षण सोडतो. बघुया काय करतो ते!’, असे प्रति आव्हानच दिले आहे. संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एकटे फिरण्याचे आव्हान दिले होते. ते चॅलेंज राणेंनी स्वीकारले आहे.

ते म्हणाले, मला पोलिसांनी जबरदस्तीने संरक्षण दिले हे राऊतांना माहीत नाही. कारण राऊत तेव्हा शिवसेनेत नव्हते.

काशी यात्रेच्या ट्रेनला हिरवा कंदिल

भाजप आमदार राम कदम यांच्याकडून ७ जानेवारी रोजी वृद्ध आई-वडिलांसाठी, काशी यात्रेकरूंसाठी काशी यात्रेची ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सोडण्यात आली. काशी आणि सारनाथचे दर्शन घडवण्यासाठी ही ट्रेन सोडण्यात आली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या ट्रेनला हिरवा कंदील दिला. लोकमान्य टिळक टर्मिनसवरून या ट्रेनने तीन हजार प्रवासी काशी यात्रेसाठी रवाना झाले आहेत. याप्रसंगी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटेचा आदी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -