डॉ. सुकृत खांडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
मुंबई : समाज माध्यमाच्या भाऊ गर्दीमध्ये देखील वृत्तपत्रांची भूमिका अबाधित असून समाजाला दिशा दाखवण्याचे काम वृत्तपत्र करतात. प्रिंट मिडिया हे आजचे प्रभावी माध्यम आहे आणि भविष्य काळात देखील प्रिंट मिडीया कायमच राहणार, असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण समारंभाच्या कार्यक्रमात केले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून व मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी दैनिक ‘प्रहार’चे संपादक, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समारंभाध्यक्ष म्हणून आमदार संजय केळकर, आदिवासी सेवक गंगाधर म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार सुहास बि-हाडे, ज्येष्ठ पत्रकार रामहरी कराड व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर व्यासपीठावर उपस्थित होते.
डिजिटल माध्यमांच्या प्रभावामध्ये वृत्तपत्रांचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी पत्रकारांनी आवश्यक ते बदल स्वतःमध्ये करायला हवेत, असे मत डॉ. सुकृत खांडेकर यांनी मांडले. २२ वर्षे संस्था चालवणे हे ‘शिवधनुष्य’ उचलण्यासारखे आहे असे सांगत त्यांनी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांचे कौतुक केले.
पारितोषिक वितरण समारंभामध्ये डॉ. सुकृत खांडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार, रामहरी कराड यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार, सुहास बि-हाडे यांना कै. यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार व गंगाधर म्हात्रे यांना जीवनगौरव पुरस्कार, तसेच विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अरुण सुरडकर, भारत शंकरराव गठ्ठेवार, दिलीप जाधव आणि दिपक सोनवणे यांना पत्रकार भूषण पुरस्कार, तर उद्योजक शुभम गुप्ता यांना उद्योगश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सुनिल साहेबराव टिप्परसे, सुमंगल मोहिते, सुहास पाटील, सचिन खुपसे, राजू केशवराव यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वृत्तपत्र लेखक कृष्णा काजरोळकर, विश्वनाथ पंडीत, रमेश लांजेवार, श्याम ठाणेदार व संजय साळगावकर यांना पत्रभूषण पुरस्कार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वैशाली बेलाशे यांना शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सावी दिवाळी अंक, पालघर, दै. किल्ले रायगड, रायगड आणि गंधाली, मुंबई ह्या दिवाळी अंकांना उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.