
नाशिक : शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे आजपासून २ दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या दौऱ्याच्या आधीच उद्धव ठाकरेंना धक्का बसला आहे. ५० पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये यापूर्वीदेखील संजय राऊतांच्या दौऱ्यानंतर ठाकरेंना धक्का बसला होता.
https://twitter.com/mieknathshinde/status/1611287674345881600
गेली अनेक दिवस नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ही गळती थांबवत डॅमेज कंट्रोलसाठी राऊत नाशिकमध्ये मैदान तयार करण्यासाठी येत आहेत. नाशिकच्या संपर्क प्रमुखांसह, माजी आमदार, माजी १२ नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी मागील १५ दिवसात पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. तर आज ५० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ आता शिंदे गटाचा ओळखला जात आहे. त्यात आता शहरातील ठाकरे गटातील काही पदाधिकारी हे शिंदे गटामध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे संजय राऊत हे नाशिकमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
नाशिकसाठी स्वत: उद्धव ठाकरे हे मैदानात उतरणार आहेत. या महिन्याच्या अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे नाशिकमध्ये येणार असून ते जाहीर सभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत २ दिवसीय नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. नाशिक महापालिकेचे बारा माजी नगरसेवक आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते तसेच उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाऊसाहेब चौधरी आणि जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला.