Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

भारताच्या विकासगाथेत प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे - केंद्रीय मंत्री नारायण राणे

भारताच्या विकासगाथेत प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे - केंद्रीय मंत्री नारायण राणे

पणजी : पणजी येथे गोवा एमएसएमई अधिवेशनाला केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री नारायण राणे यांनी आज संबोधित केले. गोवा सरकारच्या व्यापार, उद्योग आणि वाणिज्य विभागाच्या सहकार्याने लघु उद्योग भारतीने (एलयुबी) हे अधिवेशन आयोजित केले होते. राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचा सर्वात मोठा मेळावा असे या कार्यक्रमाचे वर्णन केले जाते आणि लघु उद्योग भारतीच्या गोवा विभागाचा अधिकृत आरंभ या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला.


गोवा एमएसएमई अधिवेशन ही गोव्यातील एमएसएमई क्षेत्रातील प्रतिनिधींची परिषद असून नेटवर्क, कल्पना आणि ज्ञान सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करण्याचा या परिषदेचा उद्देश आहे. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात ‘व्यवसाय प्रक्रिया स्वयंचलन’ ते ‘ब्रँड आधारित विकास’ पर्यंत अनेक विषयांवरील अनेक सत्रांमध्ये उद्योजकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात, लघु उद्योग भारतीच्या गोवा विभागाने निर्यात वाढवण्यावर आणि राज्यात रोजगार निर्माण करणारे आणि उद्योजकतेला चालना देणारे औद्योगिक समूह तयार करण्यावर भर देण्याचा संकल्प व्यक्त केला.


भारतीय अर्थव्यवस्थेत गतिमानता आणण्यासाठी लघु उद्योग भारतीच्या निःस्वार्थ प्रयत्नांबद्दल, यावेळी बोलताना केंद्रीय केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी लघु उद्योग भारतीचे आभार मानले. स्थायी उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टीने राज्यासाठी कायमस्वरूपी उद्योगांची नितांत गरज आहे असे सांगत त्यांनी राज्यात औद्योगिक उपक्रमांची भरभराट सुनिश्चित करण्यासाठी गोवा राज्याने ठोस योजना तयार करण्याचे आवाहन केले. एकत्रितपणे काम करून राज्याच्या अर्थव्यवस्थेत अधिक चैतन्य निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी सर्व संबंधितांना केले.


उदात्त ध्येय आणि महत्वाकांक्षा असण्याची एमएसएमई क्षेत्राची गरज त्यांनी अधोरेखित केली. राज्यातील सुमारे 96% उद्योग हे सूक्ष्म श्रेणीतील आहेत, या क्षेत्रामध्ये विकासाची प्रचंड क्षमता आहे, असे नारायण राणे यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या क्षेत्रात बारकाईने रस घेतात त्यात एमएसएमई क्षेत्राचा समावेश आहे असे सांगत पंतप्रधान नियमितपणे एमएसएमई क्षेत्राच्या वृद्धी दराबाबत स्थिती जाणून घेत असतात अशी माहिती राणे यांनी दिली.


सर्व सूक्ष्म उद्योगांना लहान श्रेणीत आणि सर्व लघु उद्योगांना मध्यम श्रेणीत विकास करण्याचे आव्हान देत, केंद्रिय मंत्र्यांनी सांगितले की, देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्याचे दरडोई उत्पन्न जास्त असले तरी,येथील नागरिकांनी विकसित देशांनी प्राप्त केलेल्या स्तराशी बरोबरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राज्यात पाहिलेला वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा आणि शिस्तीचे त्यांनी कौतुक केले आणि गोवावासीयांनी या त्यांच्या सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित करून राज्याच्या अर्थव्यवस्थेला अधिक उंचीवर नेण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. भारताच्या विकासगाथेत कशाप्रकारे योगदान देता येईल आणि उर्वरित जगासाठी देश एक तेजस्वी उदाहरण म्हणून उदयाला येण्यासाठी कशा प्रकारे मदत करता येईल याचा विचार प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे असे ते म्हणाले.


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचे आभार मानले. केंद्र आणि राज्य सरकारांनी सुरू केलेल्या सर्व विविध योजना आणि प्रोत्साहनांचा वापर करून व्यवसाय आणि गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा विकास करण्याचे आवाहन त्यांनी एमएसएमई क्षेत्रातील प्रतिनिधींना केले. गोव्याचे पर्यटनावरील अवलंबित्व कमी करून आर्थिक पाया वैविध्यपूर्ण करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. यातूनच स्वयंपूर्ण गोव्याचे ध्येय आणि त्यातूनच आत्मनिर्भर भारताचे ध्येय साकार होऊ शकेल, असेही ते म्हणाले.


यावेळी लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, पंजाब नॅशनल बँकेचे कार्यकारी संचालक विजय दुबे आणि बीएसई इंडियाचे स्टार्टअप्स आणि एसएमईचे प्रमुख अजय ठाकूर उपस्थित होते.

Comments
Add Comment