
रेल्वेमंत्र्यांची घोषणा
नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करत असाल आणि तुमच्या गाडीला उशिर झाला तर तुम्हाला तिकिटाची संपूर्ण रक्कम परत दिली जाणार आहे. तुम्ही प्रवास करत असणाऱ्या एक्स्प्रेसला तीन तासांपेक्षा जास्त उशिर झाल्यास तिकिटाचे सर्व पैसे रिफंड मिळणार आहेत. एवढेच नाही तर नाश्ता- जेवणही फ्री मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
अनेकदा एक्स्प्रेस विविध कारणांमुळे उशिरा धावत असतात. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात तिकीट रद्द केल्यास पूर्ण रिफंड मिळत नाही. पण आता यात बदल करण्यात आला आहे. आता ३ तास ट्रेन उशिराने असल्यास, तिकीटाचे संपूर्ण पैसे मिळणार आहेत. मग ती तिकीट कन्फर्म असो किंवा मग आरएसी.
हिवाळ्यात अनेकदा धुक्यात गाड्या उशिराने धावतात. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु अशा परिस्थितीत रेल्वे तुम्हाला अनेक सुविधा देते. मात्र, आता तुमची गाडी तीन तास उशिराने असेल तर तिकीट परताव्याची संपूर्ण रक्कमही परत केली जाणार आहे.