Wednesday, July 17, 2024
Homeमहत्वाची बातमीदर दोन वर्षांनी विश्व मराठी संमेलन भरवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दर दोन वर्षांनी विश्व मराठी संमेलन भरवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : “विश्व मराठी संमेलनास राज्य शासन पूर्ण पाठबळ देईल आणि दर दोन वर्षांनी राज्यातील निरनिराळ्या शहरांमध्ये हे संमेलन भरविण्यात येईल”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे आज मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, खासदार हेमंत पाटील, आमदार आशिष शेलार, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मुंबईमध्ये मराठी माणसाला ताठ मानेने जगता आले पाहिजे. मराठी माणूस या मुंबईमधून बाहेर जाता कामा नये. मुंबईतून बाहेर गेलेल्या मराठी माणसाला देखील मुंबईत परत कसे आणता येईल, यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील. आज मुंबईतले हे विश्व संमेलन खऱ्या अर्थाने आपल्या मराठी माणसांना एकत्र आणण्याची एक सुरुवात आहे”.

मुख्यमंत्री म्हणाले, “जी भाषा सर्वांना जोडते, जी भाषा सर्वांना सामावून घेते आणि जी भाषा जात, धर्म, पंथ पलिकडची माणुसकी शिकवते, माणुसकी जपते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते आणि हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी ठासून भरलेले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा, यासाठी केंद्राकडे देखील पाठपुरावा करण्यात येत आहे. मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, तसेच मराठी साहित्य संमेलनाच्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक आहे”.

“मराठी माणूस आपल्या कर्तृत्वाने आज जगभरामध्ये सगळीकडे यशाची शिखरं गाठतोय आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपण गेलो तरी मराठी भाषा कानावर पडते. या सर्व मराठी माणसांना एकत्र आणणारा दुवा म्हणून हे विश्व मराठी संमेलन आहे. मराठी भाषा आणि आपले सण, उत्सव जगभरातील मराठी माणसांना एकत्र जोडून ठेवतात, त्यामुळे गणेशोत्सव साजरा केल्याशिवाय आपल्या मराठी बांधवांना चैन पडत नाही. गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये कोरोनामुळे सगळे कामकाज ठप्प होते. आता सगळे सुरू झाले आहे, सर्व सण आपण आनंदाने एकत्रितपणे साजरे करत आहोत”, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -