Thursday, May 8, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

खासगीकरणाविरोधात राज्यातील वीज कर्मचा-यांचा संप!

खासगीकरणाविरोधात राज्यातील वीज कर्मचा-यांचा संप!

अदानी समूहाला वीज वितरणाचा परवाना देण्यास महावितरण कर्मचाऱ्यांचा विरोध


मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्या बॅनरखाली विविध संघटनांनी अदानी इलेक्ट्रिकल या कंपनीला नवीन लायसंसी देण्याला विरोध आणि कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोधासह इतर मागण्यांसाठी ४ जानेवारीपासून ७२ तासांच्या संपाची हाक दिली आहे. त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेसह ३० संघटनांचा संपात सहभागी झाल्या आहेत.


महावितरणमधील कर्मचारी, अधिकारी व अभियंत्यांच्या ३० हून अधिक संघटना बुधवारी मध्यरात्रीपासून ७२ तासांच्या संपावर जात आहेत. गरज पडल्यास हा राज्यव्यापी संप तीन दिवसांनंतरही सुरू ठेऊ, अशी भूमिका महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.


महावितरणचे खासगीकरण केले जाणार आहे. अदानी कंपनीने समान वीज वितरणासाठी परवानगी मागितली आहे. तसेच यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकार अदानी समूहाला वीजवितरणाचा परवाना देण्याची शक्यता आहे. अदानी कंपनीला कोणत्याही परिस्थितीत वीज वितरणाचा परवाना मिळू नये, ही या संपकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.


खासगीकरणाविरोधातील महावितरणच्या संपाला आम आदमी पक्षाने पाठिंबा दिला आहे. मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांनी याबाबत प्रतिक्रिया देत सांगितले आहे की, देशातील विमानतळे, बंदरे, धारावी पुनर्विकास प्रकल्प, बीएसईएस यानंतर आता सरकारी वीज वितरण कंपनी महावितरण या कंपनीलाही केंद्रातील भाजप सरकार अदानी समूहाच्या घशात घालत आहे.


दरम्यान, नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक, चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.



संपाच्या पार्श्वभूमीवर महावितरण सज्ज; नियंत्रण कक्ष कार्यरत


या संपाच्या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडलातील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक तयारी मुख्य अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार परिमंडलातील कल्याण एक आणि दोन, वसई व पालघर या चारही मंडल कार्यालयात संप काळासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. संपाच्या कालावधीत वीजपुरवठा बाधित होणे, अपघात, वीज यंत्रणेचे नुकसान अथवा अपघात यासंदर्भात आपापल्या कार्यक्षेत्रातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती देण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.


कर्मचारी, अधिकारी, अभियंते तसेच कंत्राटी कामगार या संपात सहभागी होत आहेत. त्यामुळे या संपात नसणारे कर्मचारी, अभियंते, अधिकारी याशिवाय देखभाल-दुरुस्तीसाठीच्या एजन्सीसह इतर कंत्राटदारांचे कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांच्या मदतीने संप काळात वीजपुरवठा अबाधित ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे.


कल्याण पश्चिम आणि पूर्व, डोंबिवली या विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एकसाठी नियंत्रण कक्षाचे 8879626138 आणि 8879626139 हे मोबाईल क्रमांक आहेत. तर उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, मुरबाड, शहापूर आदी भागांचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय दोनसाठी नियंत्रण कक्षाचे 8879626969 आणि 9004696511 हे मोबाईल क्रमांक आहेत. वसई, विरार, नालासोपारा, आचोळे, वाडा भागाचा समावेश असलेल्या वसई मंडल कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचे 7875760601 आणि 7875760602 हे मोबाईल क्रमांक आहेत. तर पालघर, बोईसर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा व विक्रमगडचा समावेश असलेल्या पालघर मंडल कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचे 9028005994 आणि 9028154278 हे मोबाईल क्रमांक असून संप कालावधीत ते चोवीस तास सुरू राहणार आहेत. वीजेसंदर्भातील तक्रारी व माहिती देण्यासाठी महावितरणकडून आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment