
मुंबई : “उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेचे शिक्षण हे आपल्या मातृभाषेमध्ये होत नाही, तोपर्यंत आपली भाषा ही वैश्विक भाषा होऊ शकणार नाही. यासाठी मराठी ही ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे”, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे आज मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, नवीन शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षण राज्याच्या भाषेत तयार करण्याचे सर्व राज्यांना आवाहन केले. महाराष्ट्राने त्यानुसार काम सुरू केले असून त्यात आघाडी घेतली आहे. मराठीला ज्ञानभाषा बनवण्याचे काम राज्य शासन करीत आहे”.
“जगातल्या सर्व मराठी भाषिकांना एकत्रित आणण्याचे काम या संमेलनाच्या माध्यमातून होत आहे”, असे सांगून “जगातल्या विविध भाषांतील साहित्य मराठीमध्ये अनुवादित झाले आहे. मात्र मराठीतील साहित्य हे जगाच्या विविध भाषांत अनुवादित होऊ शकले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
तसेच केवळ साहित्य क्षेत्रातच नव्हे तर उद्योग क्षेत्रातही मराठी उद्योजक पुढे असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. येत्या काळामध्ये मराठी माणूस उद्योगाच्या स्टार्टअपच्या, टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर पाहायला मिळेल आणि एक अतिशय चांगली इकोसिस्टीम राज्यात तयार करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र उद्योगांमध्ये क्रमांक एकवर होता, क्रमांक एकवर पुन्हा आम्ही त्याला आणतो आहोत आणि भविष्यात देखील तो क्रमांक एक वरच राहील, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
सर्व शिक्षण मराठीतून करणार : देवेंद्र फडणवीस
मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याचे प्रयत्न सुरू असून येत्या काळात सर्व प्रकारचे शिक्षणही मराठी भाषेतून करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.