मुंबई : महावितरणच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपामुळे ठिकठिकाणी फटका बसत आहे. सध्या कोयना धरण क्षेत्रातली वीज निर्मिती बंद झाली आहे. दुसरीकडे संप करणाऱ्या कामगारांना राज्य सरकारने नोटीस बजावली आहे. त्यांच्यावर मेस्मांतर्गत कारवाई करू असा इशारा दिला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपातून तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली आहे.
पुण्यात रस्त्यावरील सिग्नल बंद; अनेक परिसरातील बत्ती गुल; औद्योगिक वसाहतीमधील कामकाज ठप्प
राज्यभरातील सरकारी वीज क्षेत्रातील कर्मचारी मंगळवार मध्यरात्रीपासून ७२ तासांच्या संपावर गेले आहेत. याचा मोठा परिणाम पुण्यात पाहायला मिळत आहे. तसेच पुण्यातील अनेक भागांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. पुण्यात रस्त्यावरील सिग्नल बंद; अनेक परिसरातील बत्ती गुल; औद्योगिक वसाहतीमधील कामकाज ठप्प झाले आहे.
वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा महाऔष्णिक वीज निर्मितीला फटका
वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा महाऔष्णिक वीज निर्मितीला फटका, चंद्रपूर येथील ५ युनिट बंद, वीज केंद्रातील २,५०० कर्मचारी संपावर
वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा कोयना वीज निर्मितीला फटका
वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा कोयना वीज निर्मितीला फटका, कर्मचारी नसल्याने ३६ मेगावॅट वीज निर्मितीचे दोन युनिट बंद, संप असाच सुरू राहिल्यास कोयनेचे इतरही युनिट बंद होण्याच्या मार्गावर
वाशिम जिल्ह्यातील वीजेचे ३ सब स्टेशन मध्यरात्रीपासून बंद
वाशिम जिल्ह्यातील वीजेचे ३ सब स्टेशन मध्यरात्रीपासून बंद, १० हजार ग्राहक विजेअभावी अंधारात, तर ६०० कर्मचाऱ्यांचे आज वीज वितरण कंपनीसमोर आंदोलन
पुण्यातील १३ संघटना, ४५०० कर्मचारी संपात सहभागी
या संपात पुण्यातील १३ संघटना सहभागी झाल्या आहेत. सोबतच १२०० कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत.
औरंगाबादच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत
औरंगाबाद वैजापूर शहरात सकाळपासून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत आहे. तसेच परिसरात अनेक भागात देखील वीज खंडीत आहे. तर वैजापूर शहरातील जीवन गंगा सोसायटी परिसरात अर्धा तास वीज पुरवठा खंडित होता, मात्र काही वेळाने वीजपुरवठा सुरु झाला आणि सध्या तरी वीज पुरवठा पुर्ववत सुरू आहे. तसेच वैजापूर तालुक्यातील शिवराई महावितरण कार्यालयाच्या अंतगर्त असलेल्या बोर दहेगाव, करंजगाव,पालखेड, गोळवाडी,बेंदवाडी यासह १० गावांचा वीजपुरवठा खंडीत आहे. तसेच महालगाव ३३ KV कार्यालय अंतर्गत १० ते १५ गावातील वीजपुरवठा बंद झाला आहे. औरंगाबाद तालुक्यातील करमाड परिसरात पहाटे चार वाजेपासून वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पैठण तालुक्यात देखील काही ठिकाणी वीजपुरवठा बंद पडला आहे. बिडकीन गावातील कोकणवेस येथील रोहित्र सकाळपासून बंद आहे. तसेच पैठणच्या दावरवाडी महावितरण कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या नानेगाव येथील वीजपुरवठा सकाळपासून बंद आहे.
फडणवीस तोडगा काढण्याची शक्यता
संपात सहभागी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात चर्चा करणार आहेत. सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मध्य प्रदेशमधून कर्मचारी बोलवल्याने संपकरी आक्रमक
नागपूरच्या कोराडी औष्णिक केंद्रातील संपकरी कर्मचारी आक्रमक, मध्य प्रदेशमधून कर्मचारी बोलवल्याने संपकरी आक्रमक, संपकऱ्यांच्या विरोधानंतर मध्य प्रदेशच्या कर्मचाऱ्यांना परत पाठवले.
कोल्हापुरातील चार हजारांहून अधिक कर्मचारी संपात सहभागी
कोल्हापूर जिल्ह्यातील ४ हजारांवर कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामध्ये बाराशे कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. महावितरण खासगी भांडवलदाराच्या हातात गेल्यास भविष्यात दरवाढ होण्याच्या भीतीने संप सुरू केला आहे.
खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरु असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या ३० संघटनांनी हा संप पुकारला आहे. महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील नियमित रिक्त पदांच्या जागेवर आणि कामाच्या गरजेनुसार काम करत असलेल्या वीज कंत्राटी कामगारांना नियमित भरती करताना ओरिसा, राजस्थान, पंजाब या सरकारप्रमाणेच प्राधान्याने सामावून घेऊन कायम करण्यात यावे किंवा पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असताना ज्या रोजंदारी कामगार पद्धतीने कामगारांना कंत्राटदार विरहित आणि शाश्वत रोजगार दिला गेला त्याप्रमाणेच रानडे समितीच्या अहवालानुसार महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील नियमित रिक्त पदांच्या जागेवर आणि कामाच्या गरजेनुसार रोजी तिन्ही कंपनीत काम करत असलेल्या सर्व वीज कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षापर्यंत शाश्वत रोजगार देण्यात यावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
दरम्यान, नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक, चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वीजपुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल व मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू केली आहेत. ती २४ तास कार्यरत राहणार आहेत. कंपनीने ठरवून दिलेली कामे न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांनी तक्रारी देखील केल्या आहेत. पुण्यातील दोन फिडर बंद असल्यामुळे काही प्रमाणात पुणे ग्रामीण परिसरात वीज बंद होती. काही वेळापूर्वी वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. ही तांत्रिक समस्या आहे. महाराष्ट्रभर महवितरण संघटना काम करते. त्यामुळे काही प्रमाणात वीजपुरवठा खंडित होतो. त्याचा संदर्भ संपाची जोडणे चुकीचे असल्याचे महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी म्हटले आहे.