मुंबई : मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इंजिनिअरिंग आणि इतर सर्व प्रकारचे शिक्षणही मराठी भाषेतून करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. येत्या काळात सर्व शिक्षण हे मराठीत करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
मुंबईत ‘मराठी तितुका मेळवावा’ या विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, “आम्ही आता इंजिनिअरिंग किंवा इतर शिक्षणदेखील मराठी भाषेतून करणार आहोत. मराठी भाषा ही ज्ञान भाषा करणार आहोत. मराठी नाट्य संस्कृतीची प्रगल्भता इतर कशात पाहता येत नाही. जगातील आयटीमध्ये मराठी माणसाचा बोलबाला आहे. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात पुढे होता. आता त्याला आणखी पुढे आणण्याचा प्रयत्न येत्या काळात करणार आहे. जगातील प्रत्येक खंडातील लोक या संमेलनात उपस्थित आहेत. मराठी भाषेला समृद्ध करण्याचे काम स्वातंत्र्यवीर सावकरांनी केले. भारतीय भाषा जगवण्यासाठी ज्ञान भाषेत रुपांतर केले पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखले आहे.