
सुशांत सिंग मृत्यू प्रकरण आघाडी सरकारमधल्या तरुण मंत्र्याला भोवणार?
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या पोस्टमार्टमच्या वेळी उपस्थित असलेल्या रूप कुमार शाह या व्यक्तीने सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नसून त्याची हत्या झाल्याचे सांगितल्यामुळे या प्रकरणी सीबीआयच्या चौकशीत ट्विस्ट आल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत अब बेबी पेन्ग्विन दूर नही है... असे जाहीर केल्यामुळे या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधले एक तरुण मंत्री लवकरच गजाआड होण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत.
रूप कुमार शाह हा सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह नेतानाचा एक व्हीडिओ आज आमदार नितेश राणे यांनी ट्वीट केला. हाच रूप कुमार सुशांत सिंहच्या शवविच्छेदनाच्या वेळीही उपस्थित होता. अखेर सत्य बाहेर येत आहे. अब बेबी पेन्ग्विन दूर नही है... न्याय होणार!, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
चार दिवसांपूर्वीच राणे यांनी नागपूर विधान भवनाबाहेर माध्यमांशी बोलताना अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम करताना तेथील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांवर कोणाचा दबाव होता, याची माहिती तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली पाहिजे, असे म्हटले होते.
सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात एटोप्सी करणारी व्यक्ती रूप कुमार शाह यांना पोलीस संरक्षण देण्यात आल्याबद्दल माध्यमांनी विचारले असता नितेश राणे म्हणाले की, तसे असेल तर त्याचे स्वागतच आहे. कारण तुम्ही घटनाक्रम बघितला पाहिजे. जिलेटिनच्या प्रकरणांमध्ये असलेला मनसुख हिरेन याला मारण्यात आले. का मारले, कोणी मारले, हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. सुशांत सिंगची पण हत्या झाली. कारण त्याच्याकडे दिशा सालियन मृत्यू प्रकरणाबद्दलची काही माहिती होती. रूप शाह यांनी स्पष्टच म्हटले आहे की, सुशांत सिंगची आत्महत्या नसून ती हत्या आहे. त्याचा मृतदेह जेव्हा पोस्टमार्टमसाठी आणला गेला तेव्हा त्याचे हातपाय पहिल्यापासूनच तोडले गेल्याचे दिसून आले. आता रूप शाह, हा कोणासाठी काम करतो? सरकारचे... तेव्हा सरकार कोणाचे होते? उद्धव ठाकरेंचे… मग माहिती त्यांनी नको का द्यायला, असा सवाल राणे यांनी केला होता.