हजारो रुग्णांना मोठा दिलासा
मुंबई : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप संपुष्टात आला आहे. संपकरी निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत मागण्यांबाबत चर्चा केली. या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली.
निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले की, निवासी डॉक्टरांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. वसतिगृहासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आमची आज डॉक्टरांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांनी आता संप मागे घेतला असल्याचे महाजन यांनी सांगितले. आंदोलन करण्यापूर्वी मला भेटा असे देखील मी त्यांना सांगितले आहे. आधी भेट झाली असती तर हा प्रश्न निर्माण झाला नसता, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, आज आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही संप मागे घेत आहोत, असे निवासी डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉ. अविनाश दहिफळे यांनी सांगितले. संपामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयातील रुग्णांचे हाल झाले.