Tuesday, March 25, 2025
Homeमहत्वाची बातमीVideo : राजभवनातून सरत्या वर्षाला निरोप!

Video : राजभवनातून सरत्या वर्षाला निरोप!

मुंबई : मुंबईच्या निर्मितीची, भरभराटीची साक्षीदार असलेली वास्तू म्हणजे पूर्वीचे गव्हर्नमेंट हाऊस आणि आताचे राजभवन. मुंबईच्या दक्षिणेकडील अखेरच्या टोकावर राजभवन वसले आहे. मलबार हिलचा हा भाग म्हणजे किनाऱ्याला खेटून उभे एक हिल स्टेशनच म्हणता येईल.

राजभवन ४९ एकर जमिनीवर वसलेले आहे व त्याच्या तीनही बाजूंना समुद्राने वेढलेले आहे. यावरुनच त्या वास्तूची भव्यता आणि सौंदर्य लक्षात येते.

गव्हर्नर लॉर्ड रे यांनी आपले निवासस्थान थंड-शुद्ध हवा असलेल्या मलबार हिलला हलवले आणि ४७ एकर जागेवर गव्हर्नमेंट हाऊस स्थलांतरित करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर त्याचे राजभवन असे नामकरण झाले. चार वर्षांपूर्वी तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांच्या प्रयत्नांती ही वास्तू नागरिकांच्या भेटीसाठी खुली झाली.

राजभवनच्या टूरमध्ये एका डेकवर उभे राहून मुंबईच्या क्षितिजावर उदयास येणारा आणि मावळतीला जाणारा सूर्य पाहण्याचा अनुभव साठवून ठेवावा असा. हे टोक इतके शांत, तटस्थ व निष्पक्ष आहे, की मुंबईच्या इतिहासात डोकावण्यासाठी, वर्तमान अनुभवण्यासाठी आणि भविष्याची चाहूल घेण्यासाठी राजभवनसारखी दुसरी वास्तू नसावी.

हिरवंगार जंगल हे राजभवनचं एक मुख्य आकर्षण. १५ मोरांचा निवास हा तर त्यावरचा राजमुकूट. येथे सहा हजार झाडांनी हा परिसर नटला आहे. राज्यपालांच्या निवासस्थानाच्या खाली एक गुहा आहे, असं सांगितलं जायचं. पण ती शोधण्याचं श्रेय जातं महाराष्ट्राचे माजी राज्यपाल विद्यासागर राव यांना. इतिहासाची आवड असलेल्या राव यांनीच, एका दगडी भिंतीच्या मधोमध उभारलेले विटांचे बांधकाम फोडण्याची सूचना केली आणि ब्रिटिशकालीन गुहा प्रकट झाली. गाडल्या गेलेल्या अजस्त्र तोफाही प्रकाशात आल्या. आणीबाणीच्या काळात, हल्ल्याप्रसंगी समुद्रकिनाऱ्यापर्यंत नेणारी ही गुहा पाहणं हा अद्भुत अनुभव ठरतो.

राजभवन येथे सुंदर गालिचे, चित्रे, भन्नाट कोरीव काम केलेले दरवाजे आणि शोभिवंत फ्रेंच शैलीच्या खुर्च्या व सुंदर प्रतिमा असलेले सोफे यांचा मौल्यवान संग्रह आहे. राजभवनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांना या इमारतींचा इतिहास व येथे ठेवलेल्या काही वस्तूंबाबत नेहमीच उत्सुकता असते.

नागरिकांना राजभवन पाहायचे असेल तर राजभवनच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आगाऊ नोंदणी करता येते. पुढील महिन्याच्या भेटीसाठी आधीच्या महिन्याच्या १० तारखेला ऑनलाइन नोंदणी सुरू होते. त्यासाठी शुल्क आहे, प्रति व्यक्ती फक्त २५ रुपये.

तुम्हाला राजभवनला भेट द्यायची आहे का?

या लिंकचा वापर करुन तुम्ही राजभवनच्या संकेतस्थळावर (website) यासाठी नोंदणी करु शकता.

राजभवन भेटीची वेळ सकाळी 6 ते सकाळी 8:30 ही असेल व प्रतिदिवशी 30 लोकांना भेट देता येईल.

राजभवन हेरिटेज टूर मध्ये सूर्योदय गॅलरी, देवी मंदिर, भूमिगत बंकर, क्रांतिकारकांचे दालन, दरबार हॉल, जलविहार सभागृह व महाराष्ट्र राज्य स्थापना स्मारक येथे भेट देता येईल.

राजभवनात तुम्ही मंगळवार ते रविवार दरम्यान जाऊ शकता.

सोमवारी तसेच शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी राजभवन भेट बंद असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -