
बारामती : बारामती-फलटण रस्त्यावर खासगी क्लासच्या विद्यार्थिनींच्या सहलीची बस पुलावरून खाली कोसळून बसला अपघात झाल्याने चालकासह ३ मुली गंभीर जखमी तर २४ मुली व स्टाफ मेंबर किरकोळ जखमी झाले आहेत. शिर्डीतून माघारी परतत फलटणच्या दिशेने येताना यशोदा ट्रॅव्हल्सची बस बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील पुलावरून खाली गेली. यात २४ मुली किरकोळ तर ३ मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. सहलीसाठी बसमध्ये एकूण ४८ मुली व ५ स्टाफ मेंबर यांचा समावेश होता.
शिर्डी वरून इचलकरंजीला परतीचा प्रवास करत असताना ही घटना बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथे घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान जखमी मुलींसह चालक व पाच स्टाफ मेंबर यांना स्थानिक रहिवासी व पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी बारामती येथील शासकीय महिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
शनिवारी (दि.३१) रोजी पहाटे साडे तीन वाजण्याच्या दरम्यान हा अपघातात झाला. बारामती मार्गे फलटणच्या दिशेने जाताना समोरून आलेल्या वाहनाला चुकवताना बसच्या चालकाच्या डोळ्यावर समोर येणाऱ्या वाहनाचा प्रकाश पडल्याने अंदाज आला नाही. अरुंद असलेल्या रस्त्यामुळे बस थेट ओढ्यात गेली.
इचलकरंजी येथील सागर क्लासेस ८ वी ते १० वीच्या वर्गातील क्लास मधील मुलींची औरंगाबाद, दौलताबाद, वेरूळ, शिर्डी, शनी शिंगणापूर या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले होते.