लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा पोलिसांना ईमेल
मुंबई : वांद्रेमधील प्रसिद्ध माऊंट मेरी चर्चवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. लष्कर-ए-तोयबा या संघटनेच्यावतीने चर्चमध्ये बॉम्बस्फोट करण्याची ईमेलद्वारे पोलिसांना धमकी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी या धमकीच्या अनुषंगाने तपास सुरु केला आहे. दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर या परिसरात सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. ख्रिसमस सण नुकताच साजरा झालेला आहे. त्यानंतर ही धमकी प्राप्त झाल्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. माऊंट मेरी चर्च हे मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण असून याठिकाणी पर्यटक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात.
माऊंट मेरी चर्च हे वांद्रेमधील ज्या परिसरात स्थित आहे, त्याच परिसरात सेलिब्रिटी देखील राहतात. मलायका अरोरा, जॉन अब्राहम यांसारखे अनेक सेलिब्रिटी येथे येत असतात. शाहरुख खान, सलमान खान याठिकाणी वास्तव्यास आहेत.
मुंबईतील माउंट मेरी चर्च हे बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक संस्कृतीचे साक्षीदार मानले जाते. हे चर्च गेल्या ३०० वर्षांपासून मुंबईची ओळख आहे. हे देखणे चर्च १६६० मध्ये बांधले गेले. या प्रसिद्ध चर्चचे १७६१ मध्ये नूतनीकरण करण्यात आले.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यातही मुंबई पोलिसांकडे मुंबईत बॉम्बस्फोट घडवले जाणार असल्याची माहिती मिळाली होती. एका अज्ञात इसमाने फोनवरुन मुंबईतील विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणार असल्याचे सांगितले होते. मुंबई पोलिसांच्या ११२ या हेल्पलाईनवर सदर फोन आला होता. अंधेरीमधील इन्फिनिटी मॉल, जुहू येथील पीव्हीआर मॉल आणि सहारा हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी काहीच आढळून आले नाही.