
विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या घोषणा
नागपूर : धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजारांचा बोनस जाहीर करताना विदर्भात उद्योग आणि पर्यटनातून क्रांती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. त्यांनी यावेळी विदर्भासाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या.
धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजारांचा बोनस जाहीर केला असून पाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या थेट अकाऊंटला रक्कम पाठवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्राच्या विकासासाठी विदर्भ महत्वाचा आहे. विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गामुळे मुंबई आणि नागपूरला जवळ आणण्याचे काम केले आहे.
विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या प्रमुख घोषणा
- विदर्भातील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा आणि लोणार सरोवर पर्यटन विकास आराखड्यानुसार कामं सुरु आहेत
- बुलढाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित मान्यता, यामुळे सुमारे 1918 हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा होईल.
- लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी 369 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी.
- गोसीखुर्द येथे 100 एकर जागेवर जागतिक दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प उभारणार आहोत. यासाठी जागतिक निविदा मागवण्यात येणार असून, पीपीपी तत्वावर काम करण्यात येईल. लवकरच सामंजस्य करार करण्यात येईल. निधीची तरतूद देखील करण्यात येत आहे.
- गडचिरोली जिल्ह्यात 20 हजार कोटी गुंतवणुकीचा खनीज उत्खनन प्रकल्प सुरू होईल.
- सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी 755 कोटी रुपये निधी वितरित. अमरावती, नागपूर पुणे विभागातील 14 जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 222 कोटी 32 लाख रुपये वितरित.
- विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना. 70 हजार कोटीच्या रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता. त्यापैकी विदर्भामध्ये एकूण 44 हजार 123 कोटी रुपयांची गुंतवणूक. यामुळे 45 हजार रोजगार निर्मिती होणार.
- नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-1 ला सुधारित 9279 कोटींच्या सुधारित खर्चास मान्यता मिळाली आहे.
- वडसा देसाईगंज-गडचिरोली नवीन रेल्वे मार्गासाठी 1 हजार 96 कोटी इतक्या सुधारित खर्चास मान्यता. त्यानुसार 548 कोटी राज्य शासनाचा हिस्सा आहे.