मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत ४० आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. सुरुवातीला शिंदे गटाने उद्धव ठाकरे कुटुंबाविषयी मवाळ भूमिका घेतली होती. मात्र आता शिंदे गट आक्रमक झाला असून शिवसेना भवनावरही शिंदे गट ताबा घेणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र त्यातच एका आमदाराने केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिंदे गटाने काल मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. आता शिवसेना भवनाकडे शिंदे गट चालून जाणार हे निश्चित मानले जावू लागले आहे. याबाबत अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेतील. उद्धव ठाकरे स्वत: त्यांना शिवसेना भवनाची चावी देतील, असा दावाही रवी राणा यांनी केला आहे.
दरम्यान रवी राणा यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रवी राणा म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या कार्यालयात बसून उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक टक्केवारीचे काम करत होते. यातून शिवसेनेच्या कार्यालयाचा दुरुपयोग होत होता. वास्तविक पाहता महापालिकेवर प्रशासक आहे. नगरसेवकपदही रद्द झाले आहेत. त्यामुळे नगरसेवकांचे टक्केवारीचे सुरु असलेले काम बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कार्यालयाला सील ठोकण्यात आल्याचे रवी राणा यांनी म्हटले.
शिंदे गट शिवसेना भवनाचा ताब्यात घेणार असा दावा करण्यात आल्याच्या प्रश्नावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. राऊत म्हणाले की “त्यांचे बाप आले पाहिजेत. जर त्यांचा बाप असेल तर येईल. एक बाप असेल तर येतील. हे मी ऑन रेकॉर्ड सांगतोय.
राऊत पुढ म्हणाले की, शिवसेना भवन शिवसैनिकांचे आहे. बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली वास्तू शिवसेनेच्या नावानेच राहील. ती आमची आहे, अशा वल्गना फार होतात, पण तुमच्याकडे औटघटकेची सत्ता असून ती सांभाळा. शिवसेना भवन ताब्यात घेण्याची भाषा वापरलीत तर महाराष्ट्रातील वातावरण बिघडेल. तुम्हाला वातावरण बिघडवायचं असेल तर आमची तयारी आहे, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.