नागपूर : मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना भवनावरही शिंदे गट ताबा घेणार अशी चर्चा सुरू झाल्याने बिथरलेल्या उद्धव ठाकरेंना आता जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी आता थेट सरसंघचालक मोहन भागवत यांनाही आरएसएसच्या कार्यालयात लिंबू शोधण्याचा सल्ला दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज देवेंद्र फडणवीसांसमवेत नागपुरातील आरएसएसच्या कार्यालयाला भेट दिली. यावर पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे म्हणाले की, “आज ते (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) आरएसएस कार्यालयातून बाहेर पडले असावेत. पण मोहन भागवतांना मी विचारतोय की कार्यालयाचा कोपरान् कोपरा तपासून बघा. कुठे लिंब टाकलेत का तेही बघून घ्या. कदाचित आज आरएसएसच्या कार्यालयातही ते ताबा घेण्यासाठीच गेले असतील.”
“यांची नजर फार वाईट आहे, याचा आम्ही अनुभव घेतला आहे. जे काही चांगलं असेल, ते आपण नाही करू शकत तर त्याचा कब्जा कसा घ्यायचा ही त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे आरएसएसनेही यावर काळजी घेण्याची गरज आहे. कुठेही जायचे आणि ते बळकवायचा प्रयत्न करायचा. जणूकाही महाराष्ट्रात टोळ्यांचं राज्य आलंय की काय अशी भावना सामान्यांमध्ये यायला लागली आहे. काल त्यांनी आमच्या पालिकेतल्या कार्यालयाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला. आज ते आरएसएसच्या कार्यालयात गेले होते. आरएसएस मजबूत आहे म्हणून ते ताबा घेऊ शकले नसतील. पण आरएसएसनं काळजी घ्यायची गरज आहे”, असा टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.