Friday, October 24, 2025
Happy Diwali

‘थर्टी फर्स्ट’ जरा दमानं...

पोलिसांची असेल करडी नजर; आजपासून नाकाबंदी

तगड्या बंदोबस्तासह ॲक्शन प्लॅन तयार

मद्यपी चालक, टवाळखोर, हुल्लडबाजांवर कारवाई

नाशिक (प्रतिनिधी) : अवघ्या दोन दिवसांनी सर्वत्र ‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनला सुरूवात होणार असून त्या पार्श्वभूमिवर नाशिक पोलिसांनी बुधवारपासूनच जय्यत तयारी सुरु केली आहे. त्यासाठी शहरातील सर्व महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून यासाठीचा फौजफाटा सज्ज करण्यात आला आहे.

कोरोनानंतर यंदा मोठ्या उत्साहात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नाशिककर तयारी करत आहेत. ‘थर्टी फर्स्ट’ला शनिवार आणि नंतर रविवार अशा सलग दोन सुट्ट्या आल्याने नाशिककरांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे नाशिक शहराजवळील रिसॉर्ट, हॉटेल्सची बुकिंग झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी देखील शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यानुसार गुरुवारी रात्रीपासून शहरातील पोलिस ठाणेनिहाय बंदोबस्त राहणार असून, सोमवारी पहाटेपर्यंत हा बंदोबस्त राहणार आहे. त्यामुळे नाशिककरांनो ‘थर्टी फर्स्ट’चा प्लॅन करत असाल तर जपून करा, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ३१ डिसेंबरला नववर्षाच्या स्वागतासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी केली जाईल. त्यानुसार वाहतूक शाखेची पथकेही तैनात करण्यात येतील. मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. त्यापूर्वी पोलिसांनी रायडींग करणाऱ्या विरुद्ध विशेष मोहीम राबवली होती. त्यानुसार संशयितांची थेट जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी होईल. यासह सर्वत्र नाकाबंदीसह तपासणी करण्यात येईल. त्यासाठी शहरात २ उपआयुक्त, ७ सहायक आयुक्तांसह सर्व पोलिस अधिकारी - कर्मचारी, १३ पोलिस ठाण्यांचा बंदोबस्त, २ राज्य राखीव दलाच्या तुकड्या, २५० पुरुष होमगार्ड, ५० महिला पोलीस असा तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे.

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्ताची आखणी करण्यासाठी पोलिस आयुक्तालयात बुधवारी बैठक झाली. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत सर्व उपआयुक्त, सहायक आयुक्त व पोलिस निरीक्षक उपस्थित होते. त्यानुसार शहरात गुरूवार २९ डिसेंबरपासून बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. रात्री आठपासून पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून तपासणी करण्यात येईल. मद्यपी चालक, टवाळखोर व हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. यासह आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व आस्थापना, व्यवस्थापन, मॉल्स, दुकाने, उपहारगृहांमध्ये वेळेची मर्यादा पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या अाहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे. पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदी राहणार असून, वाहतूक शाखेचे पोलिसही तैनात असतील. मद्यपी चालकांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. वाहनांचे हॉर्न, सायलेन्सर तपासणी केली जाईल. पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्यांवरही पोलिस करडी नजर ठेवणार असून हॉटेल बाहेर, फिरते गस्ती पथकांद्वारे मद्यपींवर नजर ठेवण्यात येणार आहे.

हॉटेल, रिसॉर्ट चालकांना सूचना

पोलिसांनी नववर्ष स्वागत सेलिब्रेशन साठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला असून २९ डिसेंबर पासून शहरात बंदोबस्त कार्यान्वित होणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. रात्री आठ वाजेपासून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून तपासणी करण्यात येईल. त्याचबरोबर प्राशन करून वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध व हुल्लडबाजी करणाऱ्या विरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व आस्थापना, मॉल्स, दुकाने, उपहारगृहे आदींनाही या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाहीत, यासाठी सर्वांनी खबरदारी घेण्याची आवाहन पोलिसांनी केले असून नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई होईल असा इशारा नाशिक पोलिसांकडून देण्यात आला आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >