Wednesday, September 17, 2025

सीमावादाबाबत इतरांनी शिकवू नका; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

सीमावादाबाबत इतरांनी शिकवू नका; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

नागपूर : राज्य सरकार पूर्णपणे मराठी भाषकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, तसा ठराव विधानसभेत मंगळवारी मांडला जाईल. सीमाप्रश्नी मी तुरुंगवास भोगला असून, या वादाबद्दल इतरांनी आम्हाला शिकवू नये, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.

केंद्र सरकारने आयोजित केलेल्या वीर बाल दिवस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौ-यावर आले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते थेट नागपूरला जाणार होते. मुख्यमंत्री दिल्लीत असल्यामुळे सीमावादावर विधानसभेत मांडला जाणारा ठराव एक दिवसासाठी लांबणीवर पडला. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीत नव्हे तर विधानसभेच्या कामकाजासाठी नागपूरमध्ये उपस्थित राहायला हवे होते, अशी टीका शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली.

यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, सीमावाद ६० वर्षे जुना असून न्यायालयीन प्रक्रियेवर कोणताही परिणाम होऊ नये, याची काळजी राज्य सरकार घेत असून कर्नाटक सरकारनेही घेतली पाहिजे. राज्य सरकारवर टीका करणा-यांनी बेळगाव व सीमाभागांसाठी असलेला मुख्यमंत्री धर्मादाय निधी बंद केला, अनेक योजना बंद केल्या. आम्ही या योजना पुन्हा सुरु केल्या आहेत. २ हजार कोटींचा निधी म्हैसाळच्या पाटबंधा-याच्या विस्तारित प्रकल्पासाठी दिला आहे, असे सांगत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या तत्कालीन सरकारवर टीका केली.

Comments
Add Comment