Saturday, April 26, 2025
Homeमहत्वाची बातमी'आम्हाला मान खाली घालावी लागेल, इतकी हिंमत कुणाच्या बापात नाही'

‘आम्हाला मान खाली घालावी लागेल, इतकी हिंमत कुणाच्या बापात नाही’

कर्नाटकविरोधात ठराव आज किंवा उद्या मांडणार; देवेंद्र फडणवीसांनी सुनावले

नागपूर : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल, इतकी हिंमत कुणाच्या बापात नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावरून आरोप करणाऱ्या विरोधकांना विधानसभेत सुनावले. जसे कर्नाटक म्हणतेय, तसेच आपणही इंच इंच लढू. सर्वोच्च न्यायालय असेल किंवा केंद्र सरकार असेल, सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी जे काही करता येईल ते करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

कर्नाटकविरोधात आपला ठराव आणण्याचे ठरले होते. मागच्या आठवड्यातले वातावरण जरा गंभीर होते. त्यामुळे तो आणता आला नाही. आज तो आणण्याचा निर्णय होता. पण मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून निमंत्रण आले आणि महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी त्यांना दिल्लीला जावे लागले. मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीला गेले आहेत, ते दुपारी परणार आहेत. मुख्यमंत्री आज दुपारपर्यंत येतील. शक्य झाल्यास आज संध्याकाळी नाहीतर उद्या आपण हा ठराव निश्चितपणे मांडू. यासंदर्भात तसूभरही महाराष्ट्राचे सरकार मागे हटणार नाही, अशी ग्वाही मी सभागृहाला देतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

सीमावादाच्या प्रश्नावर सरकार विधिमंडळात ठराव आणणार होते. अद्याप ठराव का आणला नाही? असा सवाल विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. कर्नाटकने ठराव आणला आणि कारण नसताना सीमावाद चिघळला, अशी टीका अजित पवार यांनी केली. परिस्थिती चिघळवायचा प्रयत्न करू नका, असा गंभीर इशारा महाराष्ट्राने दिला पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. या विषयावर सभागृह एक आहे. आपल्याला या विषयावर वातावरण बिघडू द्यायचे नाही, आपल्याला एक राहायचे आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या गदारोळावर स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -