सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरण
मुंबई : मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात घोटाळा झाल्याचा आरोप केला. त्यानंतर आता मनसे नेते मनोज चव्हाण यांनीही आदेश बांदेकरांवर नवा आरोप केला आहे.
सिद्धिविनायक न्यास मंदिराकडून दरवर्षी दैनंदिनी डायरी काढली जाते. परंतु यावर्षी ती काढण्यात आलेली नाही. या डायरीवर आदेश बांदेकरांना उद्धव ठाकरे यांचा फोटो हवा आहे, असा आरोप मनोज चव्हाण यांनी केला आहे. या दरम्यान यावर होणारा खर्च टाळण्यासाठी दैनंदिन डायरी छापली नसल्याचे आदेश बांदेकर यांनी सांगितले. त्यानंतर बांदेकरांच्या या उत्तरावर मनोज चव्हाणांनी सोमवारी पुन्हा सवाल उपस्थित केला आहे.
डायरी छापली नाही मग निविदा का काढली? आदेश बांदेकरांना अध्यक्ष पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे ट्वीट मनोज चव्हाण यांनी केले आहे.
सिद्धिविनायक मंदिर न्यास यांच्या कथित अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी करत मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगर बाजार सिद्धिविनायक मंदिर असा मोर्चा काढला. सिद्धिविनायक मंदिर न्यासकडून अनागोंदी कारभार झाल्याचे मनसेने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले.