नवी दिल्ली : कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन विदर्भातील नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात वातावरण तापले आहे. कर्नाटकने त्यांच्या विधानसभेत महाराष्ट्राविरोधी ठराव मंजूर केल्यानंतर महाराष्ट्र सरकार काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज विरोधकांकडून तशी मागणीही जोरात केली गेली. यानंतर सीमाप्रश्नाबाबत ठराव आणणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. हा ठराव उद्या विधिमंडळात मंजूर केला जाईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या घरी भेट घेतली. त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी वीर बाल दिनाच्या कार्यक्रमासाठी केंद्राच्या निमंत्रणावरुन दिल्लीला आलो होतो. मुख्यमंत्री म्हणाले की, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत कायदा व सुवस्थेचा प्रश्न होऊ नये, याच्या सूचना केल्या आहेत. हा विषय ६० वर्षांपासूनचा आहे. असे असताना कोर्टातील प्रकरणावर परिणाम होऊ नये याची काळजी घ्यायला हव्या. जे आज बोलत आहेत त्यांनी सीमाभागातील लोकांच्या योजना बंद केल्या. टीका करणाऱ्यांनी माहिती घेऊन बोलावे. आम्ही पूर्णपणे सीमावासियांसाठी खंबीर आहोत. उद्या याबाबत आम्ही ठराव आणणार आहोत, असेही ते म्हणाले.