मथुरेत सर्व्हेचा आदेश
कोर्टाने २० जानेवारीपर्यंत मागितला अहवाल
मथुरा : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी व शाही ईदगाह वादाप्रकरणी जिल्हा न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. त्यानुसार, या प्रकरणी वाराणसीच्या ज्ञानवापी परिसरात झालेल्या सर्व्हेसारखा सर्व्हे होईल. सीनियर डिव्हिजनच्या कोर्टाने हिंदू सेनेच्या याचिकेवर सुनावणी करताना या वादग्रस्त स्थळाचा सर्व्हे करण्याचा आदेश दिला. तसेच सर्वच पक्षकारांना नोटीस बजावून कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्याचेही निर्देश दिले.
आता हा सर्व्हे अहवाल 20 जानेवारी रोजी कोर्टात सादर केला जाईल. या प्रकरणी हिंदू पक्ष प्रदिर्घ काळापासून सर्वेक्षण करण्याची मागणी करत होता. कोर्टाच्या आदेशानुसार, शाही ईदगाह मशिदीच्या वादग्रस्त परिसरात वैज्ञानिक सर्व्हेक्षण केले जाईल. यावर निगराणी करण्यासाठी कोर्ट आयुक्त नियुक्त करण्यासाठी जिल्हा न्यायालयात वर्षभरापूर्वी एक याचिका दाखल करण्यात आली होती.
हिंदू पक्षाने शाही ईदगाहमध्ये स्वस्तिकचे चिन्ह व मशिदीच्या खाली देवाचे गर्भगृह असल्याचा दावा केला आहे. पक्षकार मनीष यादव व वकील महेंद्र प्रताप सिंह यांनीही शाही ईदगाहमध्ये हिंदू स्थापत्य कलेचे पुरावे अस्तित्वात असून, ते वैज्ञानिक सर्व्हेनंतर उजेडात येतील असा दावा केला आहे.
फिर्यादी पक्षाचे वकील शैलेश दुबे यांनी सांगितले की, 8 डिसेंबर रोजी हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता व उपाध्यक्ष सुरजीत सिंह यादव यांनी सिव्हिल न्यायाधीश सीनियर डिव्हिजन (तृतीय) सोनिका वर्मा यांच्या न्यायालयात हा दावा सादर केला होता.
त्यात नमूद करण्यात आले आहे की, औरंगजेबाने श्रीकृष्ण जन्मभूमीच्या 13.37 एकर भूखंडावरील मंदिर पाडून ईदगाह बांधली होती. यासंबंधी त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून मंदिर बांधेपर्यंतच्या इतिहासाचे सर्वच पुरावे न्यायालयात दाखल केलेत. याचिकाकर्त्याने 1968 मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ विरुद्ध शाही ईदगाहमध्ये झालेला करारही अवैध घोषित करून रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, फिर्यादीची याचिका सुनावणीसाठी मान्य करत अमीन यांना सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.