Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीमोस्ट वॉन्टेड सिरियल किलर चार्ल्स शोभराज १९ वर्षांनी तुरुंगाबाहेर

मोस्ट वॉन्टेड सिरियल किलर चार्ल्स शोभराज १९ वर्षांनी तुरुंगाबाहेर

काठमांडू : नेपाळच्या सेंट्रल जेलमध्ये १९ वर्षांपासून शिक्षा भोगत असलेला सीरियल किलर चार्ल्स शोभराज याची आज नेपाळच्या काठमांडू सेंट्रल जेलमधून सुटका करण्यात आली. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे वृद्धत्व लक्षात घेऊन त्याची सुटका करण्याचे आदेश दिले होते. यासोबतच त्याची सुटका झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत त्याला त्याचा देश फ्रान्सला पाठवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

विशेष म्हणजे, दोन अमेरिकन पर्यटकांच्या हत्येप्रकरणी शोभराजला २००३ पासून नेपाळच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर काही समस्या उद्भवल्यामुळे चार्ल्सची आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहितीही चार्ल्स शोभराजची पत्नी निहिता बिस्वास यांनी दिली.

चार्ल्स शोभराज खून, चोरी आणि फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सामील आहे आणि भारत, ग्रीससह दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्याचा हात आहे. मात्र, नेपाळ भेटीदरम्यान दोन परदेशी पर्यटकांच्या हत्येप्रकरणी चार्ल्सला २००३ मध्ये अटक करण्यात आली. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. नेपाळमध्ये जन्मठेपेच्या शिक्षेच्या अंतर्गत २० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

शोभराज कसा बनला ‘बिकिनी किलर’?

चार्ल्स शोभराजला ‘बिकिनी किलर’ आणि ‘द सर्पंट’ म्हणून ओळखलं जात होतं. शोभराजवर २० हून अधिक लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे. शोभराज हा केवळ नेपाळचाच गुन्हेगार नव्हता, तर भारत, थायलंड, तुर्कस्तान आणि इराणमध्येही तो आरोपी होता. शोभराजला १९७६ मध्ये भारतात अटक करण्यात आली होती. पण १९८६ मध्ये तो तिहार तुरुंगातून फरार झाला होता. चार्ल्स शोभराज तिहार तुरुंगातून फरार होण्याचा किस्सा अत्यंत रंजक आहे. दिल्लीच्या तिहार तुरुंगात चार्ल्सचा वाढदिवस होता. ज्यामध्ये कैदी आणि सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. त्याने बिस्किट आणि फळांमध्ये झोपेचे औषध मिसळून सर्वांना खाऊ घातले आणि ४ कैद्यांसह पळ काढला. पण अखेर तो नेपाळमध्ये पकडला गेला. शोभराज २००३ पासून नेपाळच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

तीन दशके याच चार्ल्सचा १२ देशांचे पोलीस शोध घेत होते. सर्वात थंड डोक्याचा सीरियल किलर अशी याची ओळख होती. त्यांने केलेल्या हत्येच्या गोष्टी कानावर पडल्या तरी थरकाप उडायचा. पण, नव्वदच्या दशकात त्याची दहशत संपली आणि त्याची कहाणी अजरामर झाली. मुलींशी मैत्री केल्यानंतर चार्ल्स त्यांना अंमली पदार्थ द्यायचा आणि त्यांची हत्या करायचा. परदेशी स्त्रिया त्याच्या अमिषांना बळी पडायच्या. तो एवढा धूर्त होता आणि इतक्या चलाखीने गुन्हे करत असे की, त्याचा पोलिसांना सुगावा लागण्याआधीच तो पसार व्हायचा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -