Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

कोरोना नियंत्रणात, पण काळजी घ्या!

कोरोना नियंत्रणात, पण काळजी घ्या!

मुंबईत दिवसभरात ७ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : जगभरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. मुंबईत शुक्रवारी केवळ ७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना नियंत्रणात असून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

मुंबईत शुक्रवारी कोरोनाच्या २०८९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ७ रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी आढळून आलेल्या ७ पैकी ६ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ६ रुग्ण हॉस्पिटलमध्ये असून २ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर ५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मार्च २०२० पासून आतापर्यंत एकूण ११ लाख ५५ हजार ०७४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३५ हजार २९१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३७ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३ टक्के, तर रुग्ण दुपटीचा कालावधी १,५५,९४८ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत किंवा झोपडपट्टी सील नाही.

मुंबईत सध्या ४४४१ बेडस आहेत. त्यापैकी ६ बेडवर म्हणजे ०.१४ टक्के इतक्या बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. त्या तिन्ही लाटा थोपवण्यात महापालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान दिवसभरात २ हजार ८००, तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती.

Comments
Add Comment