Sunday, June 22, 2025

Corona Outbreaks : सोशल डिस्टन्सिंगसह गर्दीच्या ठिकाणी मास्क!

Corona Outbreaks : सोशल डिस्टन्सिंगसह गर्दीच्या ठिकाणी मास्क!

केंद्र सरकारने राज्यांना दिले महत्वाचे निर्देश


नवी दिल्ली : चीन, जपान, अमेरिका, ब्राझील आणि दक्षिण कोरियासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार (Corona Outbreaks) घातला असून कोरोना रुग्णसंख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरचाही तुटवडा भासू लागला आहे. ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट बीएफ.७ ने चीनमध्ये कहर केला आहे. भारतातही या व्हेरिअंटची लागण झालेले ४ रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारत सरकार सतर्क झाले असून केंद्र सरकारने राज्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.


गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क घालावेत, सोशल डिस्टन्सिंग नियम पाळण्याच्या सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत दिली. मनसुख मांडवीय म्हणाले की, आरोग्य मंत्रालय जागतिक परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. यासाठी राज्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यांना जिनोम सिक्वेन्सिंगसाठी सल्ला देण्यात आला आहे. जेणेकरून देशात कोणताही नवीन प्रकार आला तर त्याची वेळीच ओळख करून घेऊन पावले उचलता येतील. नाताळ सण आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यांनी सतर्क राहून मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे, स्वच्छतेची काळजी घेणे आणि सोशल डिस्टन्सिंग राखणे यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे आवाहन मनसुख मांडवीय यांनी केले आहे.


गेल्या २४ तासांत सापडलेल्या १८५ रुग्णांमुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ कोटी, ४६ लाख, ७६ हजार ५१५ एवढी झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४०२ एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५ लाख ३० हजार ६८१ वर पोहोचली आहे.



भारतीयांना घाबरण्याचे काही कारण नाही - डॉ. रवी गोडसे


जग पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगासह भारतातही भीतीचे सावट आहे. मात्र कोरोनाच्या जगभरातील वाढत्या उद्रेकामुळे भारतीयांना घाबरण्याचे काही कारण नाही, असे डॉ. रवी गोडसे यांनी म्हटले. भारतात चीनप्रमाणे कोरोनाचा उद्रेक होणार नाही, असे मत रवी गोडसे यांनी व्यक्त केले.

Comments
Add Comment