केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे राहूल गांधींना पत्र
नवी दिल्ली : संपूर्ण जगावर पुन्हा एकदा कोरोना या जीवघेण्या व्हायरसचे संकट घोंगावू लागले आहे. फक्त चीनच नव्हे तर जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल आणि अमेरिका या देशांमध्येदेखील कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारताने सावध होत उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी राहुल गांधींना पत्र लिहित भारत जोडो यात्रेत कोविड नियमांचे पालन करता येत नसेल तर यात्रा थांबवण्याचे आवाहन केले आहे.
मांडवीया यांनी राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
मांडवीया यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोरोनाच्या प्रसारावर चिंता व्यक्त केली आहे. मांडवीया यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, कोरोना महामारी ही सार्वजनिक आपत्ती आहे. त्यामुळे देशहितासाठी भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेता येईल. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. तसेच यात्रेदरम्यान सर्वांनी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करावा. भारत जोडो यात्रेत फक्त कोरोना वॅक्सीन घेतलेल्या नागरिकांना सहभागी होण्याची परवानगी द्यावी.