Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीहजरजबाबी फडणवीसांनी केली सुनील प्रभूंची बोलती बंद!

हजरजबाबी फडणवीसांनी केली सुनील प्रभूंची बोलती बंद!

नागपूर : महापुरुषांचा अवमान आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न या दोन मुद्द्यांवरुन विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पण सरकारी पक्षाच्या वतीने स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तरं दिली. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांच्या रंगरंगोटीवरुन सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पण फडणवीसांच्या बिनतोड युक्तिवादापुढे त्यांचा मुद्दा तोकडा पडला. तर दुसरीकडे तुम्हाला मंत्री व्हायचंय का? अशी विचारणा करत त्यांनी प्रभूंना शिंदे गटात येण्याचे निमंत्रणच दिले. हजरजबाबी फडणवीसांनी प्रभूंना दिलेल्या खुल्या ऑफरनंतर प्रभूंची बोलती बंद झाली.

सभागृह सुरु होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमाप्रश्नावरुन सरकारला बॅटफूटवर ढकलण्याचा प्रयत्न केला. अजितदादांना भुजबळांची साथ मिळाली. पुढे विरोधी पक्षाचा आवाज आक्रमक असतानाच ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनीही संधी मिळताच राज्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या रंगरंगोटीवरुन सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न फसला.

ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. विद्यमान स्थितीत राज्य सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नसताना नागपूर अधिवेशनात राज्यमंत्र्यांचे सगळे बंगले सजवले गेलेले आहे. ज्या बंगल्याची आत्ता आवश्यकता नाही. एकाबाजूला सरकार प्रकल्पांवर करोडो रुपये खर्च करत आहे. त्यासाठी शासन कर्ज काढते आहे. मग ज्या बंगल्याची आवश्यकताच नाही, त्यावर लाखो रुपये खर्च करण्याची आवश्यकता काय? असा सवाल उपस्थित करुन सुनील प्रभू यांनी सरकारला घेरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

पण प्रभूंचा प्रश्न संपतो ना संपतो तोच फडणवीसांनी त्यांच्या प्रश्नातली हवा काढून घेतली. “सार्वजनिक बांधकाम विभागाला कुठे माहितीये की सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणारेय? तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. आम्ही अधिवेशन सुरु असतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार करु शकतो. राहिला विषय मंत्र्यांच्या बंगल्यांच्या रंगरंगोटीचा. तर प्रत्येक अधिवेशनात अशी रंगरंगोटी होत असते आणि त्याचा खर्च लाखो-करोडो वगैरे नसतो. पाहिजे तर आपल्याला खर्चाचा हिशेब पाठवतो” म्हणत फडणवीसांनी सुनील प्रभूंचा प्रश्न निकाली काढला.

दरम्यान लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करा… असा चिमटा सुनील प्रभू यांनी फडणवीसांचे निवेदन सुरु असताना काढला. त्यावर तुम्हाला व्हायचे आहे का मंत्री, पाहिजे का संधी? असे हजरजबाबी प्रत्युत्तर फडणवीसांनी दिले अन् सभागृहात एकच खसखस पिकली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -