भाजपा आमदार भातखळकर यांनी मविआला डिवचले!
मुंबई : संत, सज्जन आणि महापुरुषांचा अपमान करत काढलेला हा मोर्चा म्हणजे सत्तेची खुर्ची गेल्यानंतर होणारा थयथयाट आहे, अशी बोचरी टीका भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली. कांदिवली पूर्व येथे भाजपाच्या वतीने माफी मांगो आंदोलनात ते बोलत होते.
“सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील संत, सज्जन आणि महापुरुषांचा अपमान केला आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी १२ व्या शतकात विज्ञानाधिष्ठित मानवतेची आणि समभावाची शिकवण दिली, संत तुकाराम महाराजांनी समाजाला दिशा दिली, त्यांचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांची उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील प्रत्येकासाठी प्रति परमेश्वर आहेत. त्यांचाही संजय राऊत आणि अमोल मिटकरी यांनी अपमान केला आहे, त्यानंतर साधा खुलासा आणि माफी सुद्धा मागितली नाही. हा त्यांचा माज जनता उतरल्याशिवाय राहणार नाही,” असा घणाघात भातखळकरांनी केला.
महाविकास आघाडीच्या महामोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपतर्फे आज मुंबईत माफी मांगो आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दोन परस्परविरोधी मोर्चांमुळे मुंबईत आज वातावरण ढवळून निघाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व देवदेवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात भाजप नेत्यांनी मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघांत माफी मांगो आंदोलन केले.
हिंदू धर्माचा अपमान करणारे, महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारे बोलभांड वाचाळ शिरोमणी संजय राऊत, अंधारबाई विरुद्ध मोर्चा. pic.twitter.com/G6LnlytX1H
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 17, 2022
कांदिवलीत भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली माफी मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी अतुल भातखळकर म्हणाले, सुषमा अंधारे व संजय राऊत यांना माफी मागावीच लागेल. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांचा अपमान केला आहे. स्वत:ला हिंदूत्ववादी म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी संजय राऊत व सुषमा अंधारे यांना अजूनही पक्षात कसे ठेवले, याचे उत्तर द्यावे.
अतुल भातखळकर म्हणाले, महाविकास आघाडीच्या मोर्चाचे खरे स्वरुप जनतेसमोर आणण्याकरीता आम्ही हे माफी मांगो आंदोलन करत आहोत. येत्या हिवाळी अधिवेशनात खासदार संजय राऊत व सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यासाठी आम्ही हिवाळी अधिवेशनात ठराव करणार आहोत.