उद्या मविआचा मोर्चा तर भाजपकडूनही मुंबईभर माफी मांगो निदर्शने करणार
मुंबई : मुंबईत उद्या महापुरुषांच्या वक्तव्याविरोधात मविआकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. तर त्याला उत्तर म्हणत भाजपकडून आशिष शेलार यांनीही मुंबईभर माफी मांगो निदर्शने आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे उद्या भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
संजय राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत. राऊतांकडून नवीन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न सुरु आहे. ठाकरे गटाकडून हिंदू देव-देवतांची टिंगल टवाळी केली जात आहे. दलित समाजाला आंबेडकरांनी आवाज दिला, त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य केली जाताहेत, हे दुर्दैवं आहे. महापुरुषांबद्दल बोलायला यांची हिंमत कशी होते. याप्रकरणी आता राऊत कधी माफी मागणार? असा सवाल शेलार यांनी केला
”बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला” असे संजय राऊत म्हणाले आहेत. मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला नसून त्यांच्या जन्म मध्य प्रदेश राज्यातील महू या गावात झाला आहे. त्यामुळे राऊतांनी केलेल्या खोट्या दाव्यामुळे विरोधकांनी राऊतांविरोधात रान उठवले आहे. अशातच सुषमा अंधारे यांच्याकडूनही दैवतांचा अपमान सुरू आहे. मात्र, त्यानंतरही उद्धव ठाकरे शांतच आहेत, असा टोला लगावताना उद्याचा मोर्चा कशाला करताय, असा टोलाही शेलारांनी लगावला. या सर्व वक्तव्याविरोधात उद्या भाजपकडूनही मुंबईभर माफी मांगो निदर्शने करणार असल्याचेही शेलारांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहास संजय राऊत यांनी वाचावा, असे म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागले. तसेच भाजपचे नेते आमदार भाई गिरकर यांनी राऊतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनी वाचावी म्हणून दोन पुस्तके पाठवली आहेत, असा चिमटाही पत्रकार परिषदेत काढला.
संजय राऊत हे त्यांचे अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाही, असे म्हणताना संजय राऊत यांच्या डॉक्टर आणि कंपाऊडर यांच्या किस्सा आणि WHO सल्लागार कोण असू शकतात असे म्हणतानाच आता यांची मस्ती आणि मिशाद बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म स्थळाबद्दल भ्रम निर्माण करण्यापर्यंत गेली आहे. खोटी माहिती पसरवणे अक्षम्य चूक आहे, या पद्धतीने खोटे पसरवून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जातोय, संविधानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म दिला हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मान्य आहे का, असा उलट सवालही आशिष शेलार यांनी केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला याबद्दल वाद निर्माण करण्याचा शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहे. हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक असल्याचा गंभीर आरोपही शेलारांनी केला. या वादामुळे आंबेडकर प्रेमींवर अफगाणी संकट आले आहे. तालिबानी भागामध्ये गौतम बुद्धाच्या प्रतिमेवर हल्ला झाला, हे आम्ही पाहिले आहे. आता शांततापूर्व पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंची शिवसेना का करते आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शेलार म्हणाले की, हे सगळे झाल्यावरही संजय राऊत यांनी माफी मागितली नाही. ज्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला, त्यांच्यासोबत गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पुढचे पाऊल टाकत जन्म स्थळाचा वाद निर्माण केला आहे. याचा भाजपकडून निषेध करतो. उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही शेलारांनी म्हटले आहे.