मध्य प्रदेशमधील माजी मंत्री असलेल्या काँग्रेस नेत्याने एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याविषयी भाषा वापरली, हे त्या पक्षाला काळीमा फासणारे तर आहेच. पण मोदींची लोकप्रियता काँग्रेसला सहन होत नाही म्हणून पक्षाचे नेते आता त्यांना आयुष्यातून संपविण्याची भाषा करू लागले आहेत. मध्य प्रदेशातील पन्ना येथील एका सभेत माजी मंत्री राजा पटेरिया यांनी लोकशाही वाचविण्यासाठी मोदींची हत्या करण्याची तयारी करा, असे सांगून टाकले. हत्या म्हणजे त्यांचा पराभव करायचा आहे, अशी त्यांनी नंतर पुष्टी जोडली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे की, मोदींविषयी विरोधी पक्षांत किती व्देष टोकाला गेला आहे, त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. मोदींच्या हत्येसाठी तयार व्हा असे सांगणे घृणास्पद तर आहेच. पण संसदीय लोकशाही पध्दतीला अशी मानसिकता अत्यंत घातक आहे. राज्यात भाजपचे सरकार आहे, देशाच्या सर्वोच्च नेत्याची हत्या करण्याची भाषा वापल्यावर राज्य सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही, कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आदेश दिल्यावर राजा पटेरिया यांच्यावर पोलिसांनी एआयआर नोंदवला आहे. पक्षाच्या माजी मंत्र्यांनेच देशाच्या पंतप्रधानांच्या हत्येसाठी तयार रहा, असे म्हटल्यावर खरे तर त्या नेत्यावर पक्षाने कठोर कारवाई कराययला हवी होती, त्याची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करायला पाहिजे होती, नेत्यांच्या आक्षेपार्ह व अवामानकारक भाषेबद्दल माफी मागायला हवी होती, पण काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते त्यावर दोन दिवस मौन पाळून बसले होते. माजी मंत्री राजा पटेरिया यांच्या वक्तव्याशी पक्ष मुळीच सहमत नाही असे पक्षाने तत्काळ का जाहीर केले नाही? याचा अर्थ काय समजायचा? उलट राजा पटेरिया कसा भला माणूस आहे, असे सांगण्याची कसरत पक्षाचे अन्य नेते करू लागले आहेत हे सर्व हास्यास्पद आहे. राजा पटेरिया हे महात्मा गांधी यांच्या विचारांना मानणारे आहेत, त्यांच्या मनात कोणाच्या हत्येचा विचार कसा येऊ शकतो, असा युक्तिवाद पक्षाचे अन्य नेते करू लागले आहेत. मोदी निवडणुका संपवून टाकतील, मोदी धर्म, जात, भाषा ( देश ) विभाजित करतील, दलित- आदिवासी- अल्पसंख्य यांचे भावी जीवन धोक्यात आहे, संविधान वाचवायचे असेल तर मोदींची हत्या करण्यासाठी तयार व्हा . हत्या म्हणजे पराभव करण्यासाठी तयार रहा अशी मुक्ताफळे राजा पटेरिया यांनी उधळली. अगोदर म्हणायचे मोदींची हत्या करायला तयार व्हा आणि नंतर सांगायचे की त्यांचा पराभव करण्यासाठी काम करा, अशी कसरत पटेरिया यांना का करावी लागली? पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरात जाऊन अटक केली आणि न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. पोलिसांनी करावाईचा हिसका दाखविल्यावर पटेरिया यांना माफी मागण्याची पश्चात बु्ध्दी सुचली. आपल्या भाषणाचा व्हिडिओ चुकीच्या पध्दतीने प्रचारात आणला गेला असे ते सांगत असले तरी मोदींची हत्या करायला तयार व्हा, असे ते कोणत्या गुर्मीत बोलले, त्याचे त्यांना कसे समर्थन करता येईल? मध्य प्रदेशचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी उशीरा का होईना. पटेरिया यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. प्रदेश काँग्रेस समितीने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विरोधी पक्षातील विेशेषत: काँग्रेस पक्षातील अनेक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सतत विखारी टीका करीत असतात. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या काळात तेथील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच मोदींना त्यांची औकात दाखवतो, अशी जाहीर धमकी दिली होती. अशा धमकी नंतर त्यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही किंवा त्यांना साधा जाबही विचारला नाही. पक्षाचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष राज्यसभेतील काँग्रसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही मोदींचा उल्लेख रावण म्हणून केला होता. मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून विधानसभा – लोकसभा निवडणुकीत कशाला प्रचाराला उतरतात, त्यांना रावणासारखी दहा तोंडे आहेत का, असा त्यांचा विचारण्याचा रोख होता. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षच पातळी सोडून पंतप्रधानांवर टीका करीत असतील तर त्याचा पक्षात नेते व कार्यकर्त्यांपर्यंत काय संदेश जातो? सन २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदींवर मौतका सौदागर अशी टीका केली होती. मौतका सौदगर टीकेला गुजरातमधील जनतेने २०१७ मधे सडेतोड उत्तर दिलेच आणि रावण म्हटल्याचा बदलाही जनतेने २०२२ च्या निवडणुकीत घेतला व काँग्रेसला चांगलाच धडा शिकवला. मोदी पंतप्रधान झाल्यावर काँग्रेसच्या नेत्यानी त्यांना चहावाला म्हणून हिणवले. पण हाच चहावाला काँग्रेसला गेली साडे आठ वर्षे भारी पडलाय. देशात दोन डझन राज्यात भाजपची सरकारे आहेत व केंद्रात सलग दुसऱ्यांदा जनतेने मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला जनादेश दिला, यामागे मोदींची तपश्चर्या आहेच पण त्यांचा सबका साथ सबका विकास हा कामाचा मंत्रही आहे. काँग्रेसचे नेते जे बेलगाम पंतप्रधानांवर टीका करतात, ते कोणाच्या आदेशाने करतात की स्वत:हून तसे बोलतात? आपल्या वरिष्ठांना खूश करण्यासाठी ते मोदींवर तोंड सुख घेतात का, मोदींची हत्या करायला तयार व्हा असे म्हणायची त्यांची हिम्मत तरी कशी होते?
पंतप्रधानांची हत्या करण्याची, भाषा शोभते का?
