Saturday, June 21, 2025

Veena Kapoor : मुलाने हत्या केलेली अभिनेत्री वीणा कपूर जिवंत!

Veena Kapoor : मुलाने हत्या केलेली अभिनेत्री वीणा कपूर जिवंत!

मुंबई : काही दिवसांपूर्वीच संपत्तीसाठी टीव्ही अभिनेत्री वीणा कपूर (Veena Kapoor) यांच्या मुलाने त्यांची हत्या केल्याचे वृत्त पसरल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. पण ज्या अभिनेत्रीच्या निधनाचे वृत्त सगळीकडे पसरले होते तिने स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. तसेच आपण जिवंत असल्याची माहिती दिली आहे.


काही दिवसांपूर्वी हत्या झालेली महिला या अभिनेत्री वीणा कपूर नव्हत्या तर जुहू भागात राहणाऱ्या एक महिला होत्या ज्यांचे नाव वीणा कपूर होते. त्यांचा मुलगा सचिन कपूरने त्यांची हत्या केली होती. दोघींचीही नावे एकसारखी असल्याने गोंधळ उडाला आणि मृत महिला या अभिनेत्री वीणा कपूर असल्याचे वृत्त पसरले होते.


निधनाची बातमी प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी अभिनेत्रीला श्रद्धांजली दिली. एवढंच नाही तर त्यांच्या मुलालाही सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. आता अभिनेत्री वीणा कपूर यांनी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यात सोशल मीडियावर मला श्रद्धांजली देण्यात आली आणि माझ्या मुलालाही अपमानित करण्यात आले आहे. यामुळे आमच्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागला आहे. मी खूप त्रासले आहे. माझे फोटो व्हायरल झाले आहेत. मला लोक श्रद्धांजली देत आहेत. लोकांचे फोन येत आहेत. मला माझ्या कामावरही लक्ष देता येत नाही आहे. त्यामुळे आता मी सर्वांना सांगू इच्छिते की माझ्या मुलाने माझी हत्या केलेली नाही. मी जिवंत आहे आणि माझ्या निधनाची वृत्त ही केवळ अफवा आहेत. या खोट्या अफवांमुळे मला काम मिळणं बंद झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment