किरीट सोमय्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली मागणी
अलिबाग (वार्ताहर) : मुरुड तालुक्यातील ठाकरे-वायकर परिवाराच्या १९ बंगले घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
किरीट सौमय्या यांच्यामते कै. अन्वय नाईक हयात असताना यांनी विविध लोकांकडून, जमीन मालकांकडून २०००-२००५ च्या दरम्यान मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात जमिनी घेतल्या होत्या. २००५-०६ मध्ये यापैकी एका प्लॉटवर घर बांधण्यासाठी/दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्र लिहिले होते, तसेच ही जागा वननियमांच्या अंतर्गत येते. २००८ मध्ये आणखीन १८ घरे/बंगले बांधण्यासाठी कै. नाईक यांनी ग्रामपंचायतीची अनुमती मागितली होती आणि ग्रामपंचायतींनी तशी अनुमती दिलीही होती. २००९ मध्ये बंगले बांधून तयार झाले.
ग्रामपंचायतीच्या जबाबदार व्यक्तींनी पहाणी करून पंचनामा, तसेच विविध कारवाई करून या बंगल्यांना मान्यताही दिली होती. त्यानंतर घरपट्टी सुरू करून बांधकामाला घर क्रमांकही दिले गेले. २००९-२०१३ मध्ये प्रतिवर्षी कै. अन्वय नाईक हे या घरांची घरपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स भरीत होते. मात्र २०१४ मध्ये रश्मी उद्धव ठाकरे व मनिषा रवींद्र वायकर यांनी ही जागा व त्यावरील बांधकाम कै. अन्वय नाईक यांच्याकडून विकत घेतले. या जमिनीवर १९ बंगले असून, ते ठाकरे-वायकर यांच्या नावाने करावे असे ठाकरे परिवाराने सातत्याने ग्रामपंचायत व शासकीय अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला होता. २०१९ मध्ये पुन्हा ठाकरे परिवाराने हे बंगले आमचे आहेत. आमच्या नावाने करा, असे पत्र देताच ग्रामपंचायतींनी ते त्यांच्या नावाने केले. त्यानंतर १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंतची घरपट्टी रश्मी ठाकरे व त्यांच्या सहकारी मनिषा वायकर यांनी ग्रामपंचायतीकडे भरली. त्यानंतर सर्व घरे त्यांच्या नावाने झाली.
यासंबंधी मी ऊहापोह केला असता, खरा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दबाव आणून २०२२ मध्ये ग्रामपंचायतीने ही घरे ग्रामपंचायतीच्या प्रॉपर्टी रजिस्टरमधून काढून टाकली. अशा प्रकारची प्रक्रिया, एन्ट्री काढून टाकणे, नोंदी मिटविणे हे कृत्य बेकायदेशीर आहे. याबाबत यापूर्वी देखील मी तक्रार केली असता ग्रामपंचायतीने मला विस्तृत पत्र पाठवून उपरोक्त सर्व बाबी खऱ्या आहेत, असे स्पष्टपणे म्हटले आहे. २०२२ मध्ये ग्रामपंचायतीने केलेली १९ बंगले गायब करण्याची कारवाई चुकीची आहे. याची आपण चौकशी करावी, तसेच ठाकरे-वायकर परिवाराच्या १९ बंगले घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांना सौमय्या यांनी दिलेल्या सविस्तर निवेदनात केली आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याशी माझी या विषयावर ५० मिनिटे चर्चा झाली. त्यावेळी पाटील यांनी १९ बंगले प्रकरणात घोटाला झाल्याचे मान्य केले. स्व. अन्वय नाईक हे हयात असताना त्यांनी हे बंगले बांधले आणि दरवर्षी ते ग्रामपंचायतीकडे करही भरीत होते. २०१४ मध्ये रश्मी उद्धव ठाकरे यांनी हे बंगले विकत घेतल्यानंतर त्याचे त्यांनी रीतसर एग्रीमेन्ट करताना अर्जात तेथे बंगलो असल्याचे मान्य केले होते. त्यानंतर प्रॉपर्टी टॅक्सही भरला होता. मात्र, मी याबाबतची तक्रार केल्यानंतर आता म्हणतात बंगले नाहीत. याची चौकशी ग्रामविकास मंत्रालयाने सुरु केली असून, त्यानंतर राजिपनेही आपला याबाबतचा अहवाल पाठविला आहे. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालयाने दबाब आणून रजिस्टरमधून बंगले गायब केले. अशा प्रकाराला ‘फोर्जरी’ म्हणत असून, ज्यांनी हा प्रकार केला त्यांच्यावर पोलीस कारवाई झालीच पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत माझी चर्चा झाली आहे. १९ बंगले घोटाळ्याचा रिपोर्टही मुख्यमंत्र्यांकडे गेला असून, याबाबत शिंदे-फडणवीस सरकारने पुढील निर्णय घ्यायचा आहे. दोन दिवसांत ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन यांची भेट घेऊन यासंबंधीचा एफआयआर कोणी दाखल करायचा याबाबत निर्णय होईल़ – किरीट सोमय्या, माजी खासदार