आमदार बच्चू कडूंचा राज, उद्धव यांच्यासह आदित्य ठाकरेंवर ‘प्रहार’
अमरावती : केवळ भाषण दिल्याने आणि फेसबुकवर गोड गोड बोलून मते मिळत नाहीत, असा टोला आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंसह शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना हाणला आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथे आयोजित कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते. जात आणि धर्म लावला तर पक्ष वाढवायला वेळ लागत नाही. सहज पक्ष वाढतो असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले. आपण मनसे पाहिला असेल, ते मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा असे म्हणायचे. केवळ बोलण्याने मते मिळत नसतात असे कडू म्हणाले. मनसेच्या १३ आमदारांना महाराष्ट्र आता विसरुन गेला असल्याचे बच्चू कडू म्हणाले. मी चार वेळा निवडून आलो. जातीचे सोंग नाही, जातीचा झेंडा नाही, धर्माचा झेंडा नाही, कोणताही नेता बोलावला नाही. तुमच्यासारख्या सामान्य माणसांनी देशात इतिहास केला. अपक्ष माणूस एकदा नाहीतर चार वेळा निवडून दिला असल्याचे कडू म्हणाले. माझे काम बघूनच तुम्ही मला निवडून दिल्याचे कडू म्हणाले.
ज्याला हात नाही, पाय नाही, डोळे नाही, ज्याला ऐकू येत नाही त्यांच्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरलो आहे. या सर्व वेदना विधानसभेत मी मांडल्या आहेत माझ्यावर ३५० गुन्हे दाखल झाले असल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले. राज ठाकरेंना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना विचारा बरं किती गुन्हे दाखल आहेत? असा सवालही बच्चू कडूंनी या सभेत बोलताना केला.
फक्त फेसबूकवर गोड गोड बोलून मते मिळत नाही असेही ते म्हणाले. बोल बच्चन करुन काही होत नाही. कर्म, कर्तव्य करणे गरजेचे आहे. कष्ट करावे लागते, असेही कडू म्हणाले.