Tuesday, September 16, 2025

महापालिकेच्या दवाखान्यात भूमाफियाची घुसखोरी

महापालिकेच्या दवाखान्यात भूमाफियाची घुसखोरी

बाळासाहेब ठाकरे क्लिनिकवर बाउन्सरचा ताबा

मुंबई : पवईतील मुंबई महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिकवर भूमाफियांनी ताबा मिळवला असून त्यांनी जागेवर दावा केला आहे.

मुंबई महापालिकेने गोरगरीब मुंबईकरांसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक ही योजना सुरू केली आहे. पण, योजनेत असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यावर भूमाफियांनी ताबा मिळवला आहे. या ठिकाणी भूमाफियांनी बाउन्सर घुसवले आहेत. या बाउन्सरर्सना दवाखान्यातून हुसकावून लावा आणि सामान्य मुंबईकरांसाठी दवाखाना सुरू करा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. त्यानंतर आज, महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने शहरातील विविध ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. मात्र, पवईतील तुंगा भागातील या क्लिनिकच्या जागेवर भूमाफियांनी ताबा मिळवला आहे. हे क्लिनिक बंद असून या जागेचा वापर होऊ नये यासाठी बाउन्सर नेमण्यात आले आहेत. पालिकेच्या या क्लिनिकवर इथल्या काही लोकांनी दावा करीत या क्लिनिकला बाऊन्सरच्या मार्फत टाळे ठोकले आहे. पवईतील पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अशोक माटेकर आणि पदाधिकाऱ्यांनी या क्लिनिकसमोर आंदोलन केले. या भूमाफियांना क्लिनिकमधून बाहेर काढा आणि हे क्लिनिक जनतेसाठी खुले करा अशी मागणी त्यांनी केली. जर हे क्लिनिक सुरू झाले नाही तर पालिका आयुक्तांच्या दालनात आंदोलन करू आणि त्यानंतर या क्लिनिकचा टाळा तोडू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाने दिला.

या आंदोलनानंतर महापालिकेच्यावतीने क्लिनिक ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई महापालिकेचे पथक आज क्लिनिकला भेट दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी संघर्ष होण्याची शक्यता आहे. क्लिनिक बाहेर महापालिकेचे कर्मचारी जमले आहेत. तर, क्लिनिकच्या आतील बाजूस बाउन्सर आहेत.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना योजनेतंर्गत मुंबईतील २२७ वॉर्डमध्ये सरासरी एक दवाखाना असणार आहे. या दवाखान्यात आजारांवर मोफत उपचार होणार आहेत. त्याशिवाय रुग्णांच्या काही चाचण्यादेखील मोफत करण्यात येणार आहे. सरासरी २५ हजार लोकसंख्येमागे एक दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने काही भागांमध्ये हे दवाखाने सुरू केले आहेत. तर, काही ठिकाणी जागा निश्चित केल्या आहेत.

Comments
Add Comment