सवाई माधोपुर : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन सहभागी झाले आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये सुरु आहे. सवाई माधोपुर येथील भदौती येथे रघुराम राजन हे राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले. यात्रेतील त्यांच्या सहभागानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे.
रघुराम राजन हे राहुल गांधी यांच्याबरोबर यात्रेत सहभागी झाल्याचा फोटो काँग्रेसने सोशल मीडीयावर व्हायरल केला आहे. द्वेषाच्या विरोधात देशाला एकत्र आणण्यासाठी लोकांची संख्या वाढत आहे. ही वाढती संख्या आपण यशस्वी होऊ हे दर्शवत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसची ही पदयात्रा आज राजस्थानमधील बिलोना कलान मुक्कामी असणार आहे.
काही दिवसांपूर्वीच रघुराम राजन यांनी केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवर टीका केली होती. सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नाही, परंतू तरीही सरकार सत्य स्वीकारण्यास तयार नाही आणि या प्रश्नाचे गांभीर्य सातत्याने कमी करत असल्याचे राजन म्हणाले होते. इतकेच नव्हे तर आर्थिक मंदीच्या समस्येवर मात करण्यासाठी मोदी सरकारला ही समस्या मान्य करावी लागेल कारण ती लपवून ठेवल्याने परिस्थिती सुधारणार नाही, असेही ते म्हणाले होते. देशात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांनी सावधगिरीचा इशाराही दिला होता.