एटीएस प्रमुखपदी सदानंद दाते
मुंबई : मुंबईसह राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बदल्यांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्य पोलीस दलात वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाकडून जारी करण्यात आले आहे. यात मुंबई पोलीस दलातील चारही सहपोलीस आयुक्त बदलण्यात आले आहेत.
मीरा भायंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची एटीएसच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून मुंबई गुन्हे शाखेची जबाबदारी लखमी गौतम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था सहपोलीस आयुक्तपदी सत्यनारायण चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस महासंचालक पदावर बदली करण्यात आली आहे. तर नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी मिलिंद भारंबे यांची वर्णी लागली आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची आयुक्तपदावरून अपर पोलीस महासंचालक कायदा सुव्यवस्था या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. पुणे आयुक्तपद रिक्त ठेवण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांची बदली करून त्यांच्या जागी मिलिंद भारंबे यांची वर्णी लागली आहे.