मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. तसेच, नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणीत ईडीला उत्तर दाखल करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले.
नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आता पुढील सुनावणी ६ जानेवारी रोजी होणार आहे. न्यायालयाला नाताळची सुट्टी लागणार असल्याने आज जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली होती. मात्र, नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असल्याचे सांगत ईडीने तातडीच्या सुनावणीस विरोध केला. त्यानंतर न्यायालयानेही तातडीने सुनावणी घेता येणार नाही, असे स्पष्ट करत नवाब मलिकांना सुटीकालीन न्यायालयात जामीन अर्ज करण्याचे निर्देश दिले. तसेच, यावेळी ईडीलाही नवाब मलिकांच्या जामिनाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.