Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीरोहित पवार म्हणाले, मी राज ठाकरेंचा फॅन!

रोहित पवार म्हणाले, मी राज ठाकरेंचा फॅन!

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज कर्नाटक सरकारच्या वल्गनांना भीक न घालता बेळगाव दौरा केला. यावेळी त्यांनी विविध ठिकाणांना भेटी देत महाराष्ट्र एकीकरण समितीमधील नेत्यांच्या भेटीही घेतल्या. रोहित पवार यांनी बेळगावहून कोल्हापूरमध्ये आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी बेळगावला जाऊ शकतो, तर सीमा समन्वयक मंत्री का जाऊ शकत नाहीत? अशी विचारणा केली. रोहित यांनी आमचे नेते १९ तारखेला जो आदेश देतील तो पाळला जाईल, ज्या कोणत्या नेत्याला बेळगावला जाण्यास सांगतात त्याचे पालन करतील, असेही नमूद केले.

रोहित पवार यांनी पुणे बंदला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, महापुरुषांचा वारंवार अवमान होत असेल, तर महाराष्ट्रातील जनता का गप्प बसेल? ते पुढे म्हणाले, पुण्यातील बंदला छोटे दुकानदार, व्यापारी यांनी सुद्धा मोर्चाला पाठिंबा दिला आहे. अस्मिता टिकवण्यासाठीच लोक एकत्र आले आहेत. राज्यपाल पत्राच्या माध्यमातून व्यक्त झाले. मात्र, माफी मागितली नाही. अमित शहा यांच्याऐवजी राष्ट्रपतींना पत्र लिहायला हवे होते. संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीला लोकं माफ करणार नाहीत. अशी किती पत्र लिहिली, तरी लोक माफ करणार नाहीत.

रोहित पवार यांना राज ठाकरेंबाबत विचारण्यात आले असता त्यांनी खोचक शब्दात टिप्पणी केली. मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन असल्याचे रोहित पवार म्हणाले. मात्र, आता ते कुठेतरी भाजपचा विचार घेऊन पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी आता स्वतःची ओरिजनल स्टाईल कायम ठेवावी. भाजप आपली राजकीय पोळी भाजून घेत असेल, तर त्याला आपण पाठिंबा का द्यायचा? राजकारण हे तात्पुरते असते, विचार हे दीर्घकालीन असतात, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निनावी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर रोहित पवार यांनी भाष्य केले. शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत, असे अनेक फोन, धमक्या या आधी सुद्धा आल्या आहेत. मात्र, सामान्यांना केंद्रबिंदू ठेवून साहेब काम करत आहेत. महाराष्ट्रात खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे, अशा येणाऱ्या धमक्यांबाबत काळजी घेतली पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -