Saturday, July 20, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यशतकपूर्ती करणारे रामभाऊ जोशी

शतकपूर्ती करणारे रामभाऊ जोशी

महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांनी आपल्या आयुष्यातील शतकाची वाटचाल पूर्ण केली असून १३ डिसेंबर २०२२ रोजी ते १०१व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. या २०-२१व्या शतकातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील असंख्य घटनांचे साक्षीदार असणारे, त्या सर्व घटनांचे वृत्तपत्रांतून वार्तांकन करणारे व ग्रंथरूपाने प्रकाशित करणारे रामभाऊ जोशी हे राज्यातील एकमेव पत्रकार आहेत. कोणत्याही महाविद्यालयाची व विद्यापीठाची पत्रकारितेची पदवी न घेता स्वतःच्या अनुभवाच्या माध्यमातून त्यांनी केलेला प्रवास हा लक्षणीय स्वरूपाचा आहे. पत्रकारितेमध्ये लेखन करताना त्या ठिकाणी जागेची मर्यादा असते; परंतु विविध घटनांचे बारकावे टिपून व त्यांचे संदर्भ शोधून ग्रंथ लेखनाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविण्याची किमया साहित्यिक रामभाऊ जोशी यांना प्राप्त झालेली होती. त्यांच्या या शतकाच्या वाटचालीसाठी त्यांचे अभीष्टचिंतन!

रामभाऊ जोशी हे मूळचे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात असणाऱ्या चिंचणी या गावचे. ते दीड वर्षांचे असतानाच त्यांना आईच्या दुःखद निधनाचे चटके सोसावे लागले. त्यांचे वडील भिक्षुकी व्यवसाय करीत असत. रामभाऊ जोशी यांना दोन भाऊ, एक बहीण व वडील असा परिवार होता. चरितार्थाचे अन्य कोणतेही साधन नसल्याने सर्व जोशी कुटुंबीय वाई येथे आले. वाईमध्ये त्यांचे वडील (आण्णाजी जोशी) भिक्षुकी व्यवसाय करीत असत आणि रामभाऊंचे थोरले बंधू व स्वतः रामभाऊ वाई येथे अनेक श्रीमंतांच्या घरी देवपूजा करायचे व त्यामध्ये त्यांना त्या काळी एक रुपया मानधन मिळायचे. रामभाऊ यांनी स्वतःची २० वर्षे वाई येथे घालविल्यावर ते पुणे येथे आले व लेखनाची आवड असल्याने पत्रकारितेच्या शोधात हिंडत राहिले.

पुणे येथे वसंतराव कर्णे हे ‘संध्या’ नावाचे दैनिक त्यावेळी चालवत होते आणि त्याचबरोबर ‘रोहिणी’ नावाचे मासिकदेखील चालवायचे. रामभाऊ जोशी यांनी पत्रकारितेची सुरुवात ‘संध्या’ दैनिकातून केली. ‘रोहिणी’ मासिकामध्ये अनेक कथांचे लेखनदेखील केले. त्यातून त्यांची साहित्याची आवड विकसित होत गेली. त्यांचे अनुभवविश्व विस्तारत गेले. पुणे आकाशवाणी, सांगली आकाशवाणी, औरंगाबाद आकाशवाणी यामध्ये अनेक वेळा श्रुतिकालेखन देखील केले. त्यांची संख्या ५५ पेक्षा अधिक झाली. लेखनाची आवड विकसित होत असताना रामभाऊ जोशी यांनी काव्यलेखनदेखील केले. त्यामध्ये पोवाडे, वग, नाट्ये, क्रांतिकारकांविषयी गीते, विनोदी संवाद व लावण्यादेखील लिहिल्या. त्यातील काही काव्ये ‘His Masters Voice’ या कंपनीने ध्वनी मुद्रित केल्या. पंडित नेहरू यांच्या वाढदिवसानिमित्त कोलंबिया रेकॉर्ड कंपनीने पंडित नेहरू यांच्यावर पोवाडा रचण्याची जबाबदारी पूर्ण केली आणि तो कोलंबियाने प्रसारित देखील केला. याच काळात रामभाऊ जोशी यांनी थोर लेखक व राजकीय नेते यांच्या घेतलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातील अनेक नभोवाणी केंद्रांने प्रसारितही केल्या. पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरत असताना रामभाऊ जोशी यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले. त्यातील बरेचसे लेखन यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक व वैयक्तिक जीवनावर प्रकाश टाकणारी आहेत. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे रामभाऊ जोशी यांना यशवंतराव चव्हाण यांचा लाभलेला दीर्घकाळचा सहवास. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्यापासून यशवंतराव चव्हाण यांच्याशी रामभाऊंनी अत्यंत घनिष्ट संबंध ठेवले. हे त्यांचे संबंध १९६० ते १९८४ इतक्या दीर्घकाळापर्यंत उभयतांनी अत्यंत मनापासून जोपासले.

यशवंतराव चव्हाण परराष्ट्रमंत्री असताना त्यांनी जगातील विविध देशांचा प्रवास केला. त्या ठिकाणी अनेक देशातील अनेक पक्षाचे नेते व त्यांच्या देशातील अनेक घटनांची प्रत्यक्ष माहिती घेणे व आपल्या देशाचे मत अत्यंत जबाबदारीने व्यक्त करणे ही बाब यशवंतराव चव्हाण यांनी कौशल्याने पार पाडली; परंतु हे त्यांचे परदेशातील दौरे सपत्नीक झालेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या पत्नी वेणूताई चव्हाण दिल्लीमध्ये वास्तव्य करीत असताना त्यांना पत्रांच्या माध्यमातून विविध देशांचे व तेथील नेत्यांचे दर्शन घडविण्याचे कौशल्य यशवंतरावांनी साध्य केले होते.

वेणूताई चव्हाण यांचे १ जून १९८३ मध्ये निधन झाले आणि यशवंतराव हे दिल्लीमध्ये असताना त्यांच्या मनातील वेणूताईच्या संबंधात त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या भावभावना व मनातील अनेक घटनांचे बारकावे टिपण्याच्या उद्देशाने रामभाऊ जोशी हे दिल्ली येथे यशवंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी मुक्कामास गेले. त्याचकाळात यशवंतराव चव्हाण यांनी वेणूताई यांना लिहिलेल्या सर्व पत्रांची फाइल रामभाऊ जोशी यांच्या स्वाधीन केली आणि असे मत व्यक्त केले की, ‘ही माझी वेणुविषयीची आठवण, आपण त्यांचा सदुपयोग कराल हे खचित!’ आणि त्यातून ‘विदेशदर्शन’ या ग्रंथाची निर्मिती झाली.

रामभाऊ जोशी यांनी आपल्या पत्रकारितेच्या वाटचालीमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या ८ ग्रंथांची निर्मिती केली. त्यातील पहिला ग्रंथ म्हणजे ‘यशवंतराव – इतिहासाचे एक पान’ हा ग्रंथ वाचकांच्या हाती पडला आणि यशवंतरावांच्या वैयक्तिक, राजकीय, सामाजिक, सांगितिक जीवनातील अनेक पैलूंची ओळख त्यांना झाली. रामभाऊ जोशी यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतील असंख्य नोंदी लक्षात घेण्यासारख्या आहेत. त्यामध्ये एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, मोहन धारिया, काकासाहेब गाडगीळ, विठ्ठलराव गाडगीळ त्याचप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्राळ व इंदिरा गांधी यांच्या रामभाऊ जोशी यांनी घेतलेल्या मुलाखती म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील ठळकपणाने नोंद घ्याव्यात, असाच भाग ठरला. या सर्व थोर राजकीय नेत्यांचा व सत्ताधारी नेत्यांचा घनिष्ट संबंध असूनदेखील रामभाऊ जोशी यांनी स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबीयांसाठी कोणत्याही सहकार्याची अपेक्षा ठेवली नाही. इतक्या दीर्घकाळापर्यंत पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करूनही निस्पृह व निरपेक्ष वृत्ती जाणीवपूर्वक सांभाळणे ही गोष्ट फक्त रामभाऊ जोशी यांनाच साध्य झाली. पत्रकारितेच्या क्षेत्रात ६ दशके कार्य करीत असताना कोणत्याही राजकीय पक्षांच्या संबंधात रामभाऊ जोशी यांनी स्वतंत्र असा दृष्टिकोन ठेवला नाही. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी दिलखुलासपणे बातचीत करणे व त्यांच्या मनातील सर्व विचार कौशल्याने काढून घेणे व वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम रामभाऊ जोशी यांनी अत्यंत जाणीवपूर्वक केलेले आहे. त्यामध्ये ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे गोळवळकर गुरुजी असोत किंवा कम्युनिस्ट पक्षाने श्रीपाद अमृत डांगे असोत, लोकशाहीचे तत्त्व मानणारे बाळासाहेब भारदे असोत, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत किंवा शेतकरी कामगार पक्षाचे नेते असोत. या सर्वांशी रामभाऊ जोशी यांनी घनिष्ठ संबंध ठेवले होते. त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीतून त्यांचे विचार वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम रामभाऊ जोशी यांनी जाणीवपूर्वक केलेले आहे.

रामभाऊ जोशी यांनी राज्य श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपद भूषविले आणि त्या काळात नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करण्याचे कामही केलेले होते. ही त्यांची जबाबदारी पार पाडत असताना पुण्यामध्ये पत्रकारांसाठी स्वतंत्र निवासस्थान असावे व त्यासाठी आवश्यक असणारा भूखंड प्राप्त करून घ्यावा, या हेतूने रामभाऊ जोशी यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. त्याचे फळ म्हणजे सेनापती बापट रोडवर निर्माण झालेले ‘पत्रकार नगर’ हे जसे खरे तसेच पत्रकारांसाठी विविध विषयांवर शिबीरे घेणे, सभा घेणे यासाठी त्यांनी स्वतः जबाबदारी घेऊन पुणे येथे ‘पत्रकार भवन’ उभे केले.

रामभाऊ जोशी यांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कार लाभलेले आहेत. त्यामध्ये मुंबई मराठी पत्रकार संघ, यशवंतराव चव्हाण मुंबई आणि पुणे शाखा यांच्यातर्फे सामाजिक कार्य पुरस्कार लाभला. त्यांना कराड येथील ‘यशवंतराव-भूषण’, ‘यशवंतराव जीवन गौरव’, ‘राष्ट्रीय ट्रस्ट नेते यशवंतराव नीती व संस्कृती साहित्य पुरस्कार’ त्याचप्रमाणे ‘काळकर्ते शिवराम महादेव परांजपे पुरस्कार’ वृत्तपत्रातील लेखनासंबंधात सकाळतर्फे डॉ. ना. भि. परुळेकर पुरस्कार, केसरी मराठा संस्थेचा ‘जयंतराव टिळक पत्रकार पुरस्कार’ व दैनिक पुण्यनगरीतर्फे ‘पुण्यभूषण पुरस्कार’ आदी लाभलेले आहेत. वयाची १० दशके पूर्ण केल्यानंतर स्वतःची स्मृती अत्यंत तल्लख ठेवण्याची संधी रामभाऊ जोशी यांना लाभली ही बाबदेखील लक्षात घेण्यासारखी आहे. त्यांच्याकडे असंख्य अनुभवांची पोतडी आहे. आपण प्रसंग सांगावा, व्यक्ती सांगावी आणि रामभाऊंनी त्यांच्या संबंधातील आठवणींची माहिती सविस्तर आणि सहजपणे सांगावी, हे त्यांच्या वयाच्या १००व्या वर्षीदेखील साध्य झाले आहे. रामभाऊ जोशी यांचे उर्वरित आयुष्य सुखसमाधानाचे आणि आरोग्यदायी जाईल हे निश्चित!

-अनिल जोशी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -